नगर परिषद आणि पंचायतींच्या प्रारूप प्रभागरचनेच्या कामाला सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2021 04:10 AM2021-08-21T04:10:28+5:302021-08-21T04:10:28+5:30
मुंबई : राज्यातील १५० नगर परिषदा आणि नगरपंचायतींच्या प्रभागरचनांची प्रक्रिया सुरू झाली आहे. राज्यात डिसेंबर २०२१ ते फेब्रुवारी २०२२ ...
मुंबई : राज्यातील १५० नगर परिषदा आणि नगरपंचायतींच्या प्रभागरचनांची प्रक्रिया सुरू झाली आहे. राज्यात डिसेंबर २०२१ ते फेब्रुवारी २०२२ या कालावधीत मुदत संपणाऱ्या नगर परिषदांच्या निवडणुकीसाठी प्रारूप प्रभागरचनेचा कच्चा आराखडा तयार करण्याचे लेखी आदेश राज्य निवडणूक आयोगाचे उपायुक्त अविनाश सणस यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी यांना दिले आहेत. त्यानुसार ही प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी मतदारयादी तयार करणे, निवडणूक संचालन नियंत्रण करण्याची जबाबदारी राज्य निवडणूक आयोगाकडे आहे. नगर परिषद अधिनियमानुसार मुदतपूर्व निवडणूक घेणे गरजेचे आहे. त्यानुसार आता प्रभागरचना होणार असून यात प्रत्येक प्रभागात एक सदस्य रचना तयार करण्यात येणार आहे. प्रभागरचनेचा कच्चा आराखडा तयार करण्याच्या कामाला २३ ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. त्यासाठी २०११ ची लोकसंख्या, नकाशे विचारात घेतले जाणार आहेत.
प्रभागरचनेनुसार सदस्यसंख्या अंतिम करण्यात येणार असून वाढीव शहर हद्द व इतर भाग यात समाविष्ट केला जाणार आहे. ही सर्व प्रभागरचना करताना गोपनीयता बाळगण्याचे आदेश देण्यात आले आहेत. प्रारूप प्रभागरचना तयार झाल्यावर याबाबतची माहिती तत्काळ राज्य निवडणूक आयोगाला कळवायची आहे. त्यानंतर प्रभागरचना, आरक्षण व सोडत कार्यक्रम आदी बाबी निवडणूक आयोगाकडून पार पाडल्या जातील.