Join us

भुयारी मेट्रो-३ च्या रुळ जोडणीच्या कामास प्रारंभ

By ऑनलाइन लोकमत | Published: October 09, 2020 5:44 PM

Mumbai Metro : अमेरिकेतून आयात करण्यात आलेल्या फ्लॅश बट वेल्डींग मशिनद्वारे होणार रूळ जोडणीचे काम

कुलाबा-वांद्रे-सीप्झ : मेट्रो-३ मार्ग 

मुंबई : रुळांच्या कामासाठी महत्त्वाचे असलेले फ्लॅश बट वेल्डींग मशीन मुंबईत दाखल झाले असुन मशिनद्वारे मेट्रो-३ मार्गाच्या  रुळ जोडणीच्या कामास छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ स्थानक येथून शुक्रवारपासून आरंभ झाला आहे. कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो-३  मार्गासाठी हेड हार्डन्ड रुळांच्या वापर होणार आहे.

फ्लॅश बट वेल्डींगमशिनद्वारे ३४० फ्लॅश व्होल्टेज व ४२० बुस्ट व्होल्टेज चा वापर करून अलाइनिंग, प्री-हिटिंग, फ्लॅशिंग, फॉर्जिंग, स्ट्रीपिंग व एअर-क्वेंचिंग या प्रक्रिया करून रुळांचे वेल्डींग करण्यात येणार आहे. हे मशीन अमेरिकेतील मे. हॉलंड एल पी या कंपानीद्वारे बनविण्यात आले आहे. मेट्रो-३ प्रकल्पासाठी एकूण दोन फ्लॅश बट वेल्डिंग मशिन्सच्या वापर होणार आहे त्यापैकी एक मशिन नोव्हेंबर अखेरीस मुंबईत दाखल होणे अपेक्षित आहे.

ही एक स्वयंचलित मशीन असून यात योग्य दर्जाचे वेल्डींग होण्यासाठी सर्व मापदंड आधीच निश्चित करण्यात आले आहेत. या ३३.५ किमी लांबीच्या मार्गिकेचे वेल्डिंग ११ विविध ठिकाणांवरून करण्याचे नियोजन आहे, असे मुं.मे.रे.कॉचे व्यवस्थापकीय संचालक रणजित सिंह देओल म्हणाले.

मेट्रो-३ प्रकल्पासाठी एकुण १०,७४०  टन हेड हार्डन्ड रुळांची आवश्यकता असून अद्याप ८३६६ टन रूळ मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनला (मुं.मे.रे.कॉ) प्राप्त झाले आहे. उर्वरीत रूळ लवकरच जपानहून मुंबईत दाखल होणार आहेत. फ्लॅश बट वेल्डींग मशीनच्या साहाय्याने १८ मीटर लांबीच्या हेड हार्डन्ड रुळांचे वेल्डिंग करून अखंड रूळ तयार करण्यात येणार आहेत. यामुळे प्रवाशांना सुरक्षित व आरामदायी प्रवास करता येणार आहे असे मुं.मे.रे.कॉचे संचालक (प्रकल्प) सुबोध कुमार गुप्ता म्हणाले.

टॅग्स :मेट्रोमुंबईरेल्वेअमेरिका