कॉमर्सचा कटऑफ वधारला; विद्यार्थ्यांची कला शाखेकडे पाठ
By रेश्मा शिवडेकर | Published: June 27, 2024 07:48 PM2024-06-27T19:48:23+5:302024-06-27T19:48:48+5:30
मुंबई महानगर क्षेत्रातील अकरावीच्या ऑनलाईन प्रवेशाकरिता यंदा नोंदणी केलेल्या २ लाख ३८ हजार ९३४ विद्यार्थ्यांची पहिली प्रवेशाची यादी (कटऑफ) गुरूवारी सकाळी जाहीर करण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : दहावीला ९०टक्क्यांहून अधिक गुण मिळविणाऱया विद्यार्थ्यांच्या संख्येत झालेली वाढ आणि प्रवेशाकरिता कॉमर्सकडे असलेला कल यामुळे यंदा या शाखेच्या कटऑफमध्ये चांगलीच वधारणा झाल्याचे दिसून येत आहे. तुलनेत कला शाखेकडे विद्यार्थ्यांनी पाठ फिरवल्याचे दिसून येत आहे. इतकी की कला शाखेच्या प्रवेशाकरिता सर्वाधिक चढाओढ असलेल्या झेवियर्स, रूईया या नामांकित महाविद्यालयातील चुरसही कमी झाल्याचे दिसून येत आहे. तुलनेत सायन्सचा कटऑफ स्थिर असल्याचे दिसून येत आहे.
मुंबई महानगर क्षेत्रातील अकरावीच्या ऑनलाईन प्रवेशाकरिता यंदा नोंदणी केलेल्या २ लाख ३८ हजार ९३४ विद्यार्थ्यांची पहिली प्रवेशाची यादी (कटऑफ) गुरूवारी सकाळी जाहीर करण्यात आली. यातील ५५,६५५ विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीचे कॉलेज मिळाले आहे. तर २०,७८४ विद्यार्थ्यांना दुसऱया पसंतीचे महाविद्यालय मिळाले आहे.
नोंदणी केलेल्या तब्बल ५२ टक्के विद्यार्थ्यांनी प्रवेशाकरिता कॉमर्स शाखेला पसंती दर्शवली होती. त्यामुळे कॉमर्सच्या कटऑफमध्ये यंदा चांगलीच वाढ झाल्याचे दिसून येत आहे. उदा. फक्त कॉमर्सच असलेल्या पोद्दारचा कटऑफ ९३वरून ९४.४वर गेला आहे. तर डहाणूकरचा ८९.८ वरून ९०.८ वर आणि एसआयईएसचा ८६.४० वरून ८७.२ वर गेल्याचे दिसून येते. तुलनेत कला शाखेचा झेवियर्सचा कटऑफ ९४.६० वरून ९३.४ वर आला आहे. तर रूईयाचा ९२.८० वरून ९२.२ असा उतरला आहे.
पहिल्या फेरीसाठी अकरावीच्या उपलब्ध जागा - २,४९,०५०
पसंतीक्रम दिलेले विद्यार्थी - २,२८,३१२
जागा वाटप झालेले विद्यार्थी - १,३०,६५०
पहिल्या पसंतीचे महाविद्यालय मिळालेले - ५५,६५५
दुसऱया पसंतीचे महाविद्यालय मिळालेले - २०,७८३
तिसऱया पसंतीचे महाविद्यालय मिळालेले - १४,४४८
शाखानिहाय जागा आणि जागावाटप झालेले विद्यार्थी
कला - ३४,८०० - १२,८०८
कॉमर्स - १,२६,७५५ - ६९,०६०
सायन्स - ८४,२०५ - ४८,१४३
एचएसव्हीसी - ३,२९० - ६३९
एकूण - २,४९,०५० - १,३०,६५०
काही कॉलेजांची कटऑफ (कंसात गेल्या वर्षीची)
कॉलेज............कॉमर्स............सायन्स.......आर्ट्स
एचआर ..........९३..................-...............-
झेवियर्स...........८९.२............९१.६.........९३.४
केसी...............९१.४...........८७.६.........८६
रूईया.............-.................९३.४..........९२.२
पोद्दार.............९४.४............-................-
रूपारेल..........९०.६...........९१.८...........८५.८
साठ्ये.............८९.२...........९०.६.........८१
एनएम.............९३.४...........-...............-
एसआयईएस.....८७.२..........-................-
डहाणूकर.........९०.८..........-................-
वझे-केळकर....९२.४..........९२.८..........८८.४
बिर्ला..............९०.८..........९३.............८६.८
फादर अॅग्नेल...८७.............९३.८..........-
उपनगरातील कॉलेजांना पसंती
उपनगरातील कॉलेजांना विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी पसंती दिल्याचे दिसून येत आहे. उदा. ठाण्याच्या बिर्ला कॉलेजच्या तिन्ही शाखांचा कटऑफ गेल्या वर्षीच्या तुलनेत चांगलाच वाढला आहे. या कॉलेजचा गेल्या वर्षी आर्ट्सचा ६७ टक्क्यांवर असलेला कटऑफ यंदा ८६.८ टक्क्यांवर गेला आहे. कॉमर्सचा ८७.४० वरून ९०.८ टक्क्यांवर तर सायन्सचा ९२.४० वरून ९३ टक्क्यांवर गेला आहे. वाशीच्या फादर अॅग्नेलचा कॉमर्सचा ८५.६० वरून ८७ वर तर सायन्सचा ९३.४० वरून ९३.८वर गेला आहे.
बोर्डनिहाय जागावाटप झालेले विद्यार्थी
एसएससी - १,१७,४०९
सीबीएसई - ४,९५५
आयसीएसई - ७,०९८
आयबी - ८
आयजीसीएसई - ५६५
एनआयओएस - १२
इतर - ६०३
....
पहिल्या पसंती शाखानिहाय
कला - ७,४८३
कॉमर्स - २२,७४१
सायन्स - २४,८२८
एचएसव्हीसी - ६०३
एकूण - ५५,६५५
....