वाणिज्यचे निकाल मंगळवारीही रखडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2017 05:21 AM2017-08-30T05:21:22+5:302017-08-30T05:21:51+5:30
मुंबई विद्यापीठाचा निकालाचा गोंधळ अजूनही सुरुच आहे. वाणिज्य शाखेच्या ५ व्या आणि ६ व्या सत्राचे निकाल रविवारी रात्री उशीरा जाहीर झाले.
मुंबई: मुंबई विद्यापीठाचा निकालाचा गोंधळ अजूनही सुरुच आहे. वाणिज्य शाखेच्या ५ व्या आणि ६ व्या सत्राचे निकाल रविवारी रात्री उशीरा जाहीर झाले. पण, त्यानंतर संकेतस्थळात तांत्रिक बिघाड झाल्यामुळे मंगळवारीही निकाल कळले नाहीत. सोमवारी विद्यापीठाने निकाल महाविद्यालयांकडे पाठविल्याचे स्पष्ट केले होते. पण, मंगळवार उजाडूनही काही महाविद्यालयात निकाल पोहचलेले नाहीत.
रविवारी रात्री उशीरा टीवाय बीकॉमच्या ५ व्या आणि ६ व्या सत्राचे निकाल जाहीर करण्यात आले. सोमवारी सकाळी ही बातमी विद्यार्थ्यांना कळल्यावर त्यांनी लॉगइन करायला सुरुवात केली. पण, संकेतस्थळात तांत्रिक बिघाड झाले. त्यामुळे निकाल दिसत नव्हते. मंगळवारी सलग दुसºया दिवशीही संकेतस्थळ बंद होते.
मुंबई विद्यापीठाने यंदा घेतलेल्या पदवी परीक्षांच्या उत्तरपत्रिकांची तपासणी आॅनलाईन पद्धतीने केली. पण, नवीन पद्धत सुरु करताना कुलगुरुंनी घाई केल्यामुळे आता निकालाचा गोंधळ उडाला आहे. जून महिन्यात लागणारे निकाल अजूनही जाहीर झालेले नाहीत. तसेच अजूनही हजारो उत्तरपत्रिकांची तपासणी झालेले नाही. त्यामुळे मुंबई विद्यापीठ टीकेचे धनी झाले आहेत. वाणिज्य शाखेचा निकाल जाहीर न झाल्यामुळे हजारो विद्यार्थ्यांची कोंडी झाली आहे. तसेच पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशाच्या तारखा पुढे ढकलायला लागल्या आहेत.
३१ आॅगस्टपर्यंत सर्व निकाल जाहीर करणार असल्याचे विद्यापीठाने न्यायालयाला सांगितले आहे. पण, वाणिज्यचा निकाल जाहीर करुन विद्यापीठ अजूनच फसले आहे. कारण, निकाल जाहीर होऊनही विद्यार्थ्यांना निकाल कळला नाही. गुणपत्रिका मिळण्यास अजून दोन आठवड्यांचा कालावधी लागेल अशी माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. मंगळवारी झालेल्या जोरदार पावसामुळे विद्यार्थ्यांना महाविद्यालयातही जाता आले नाही. त्यामुळे अजूनही विद्यार्थी निकालाच्या प्रतीक्षेत आहेत.
मुंबईत मंगळवारी सुरु असलेल्या मुसळधार पावसाचा फटका मुंबई विद्यापीठाच्या उत्तरपत्रिका तपासणीलाही बसला. मंगळवारी दिवसभरात फक्त ५ हजार ८४७ उत्तरपत्रिकांची तपासणी पूर्ण झाली. १४७ प्राध्यापक उत्तरपत्रिका तपासणीसाठी हजर होते.