आयोगाला स्वप्निलच्या आत्महत्येनंतर आठवड्याने जाणीव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:09 AM2021-07-14T04:09:05+5:302021-07-14T04:09:05+5:30

पुढील कार्यवाही प्राधान्याने करण्याचे आश्वासन लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : स्वप्निल लोणकर या एमपीएससी उमेदवाराच्या आत्महत्येला आठवडा उलटल्यानंतर एमपीएससी ...

The commission realized the week after Swapnil's suicide | आयोगाला स्वप्निलच्या आत्महत्येनंतर आठवड्याने जाणीव

आयोगाला स्वप्निलच्या आत्महत्येनंतर आठवड्याने जाणीव

Next

पुढील कार्यवाही प्राधान्याने करण्याचे आश्वासन

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : स्वप्निल लोणकर या एमपीएससी उमेदवाराच्या आत्महत्येला आठवडा उलटल्यानंतर एमपीएससी परीक्षांत उत्तीर्ण होऊनही नोकरी मिळत नसल्याच्या तणावाने आणि आर्थिक परिस्थितीमुळे ही दुःखद घटना घडल्याची जाणीव एमपीएससी आयोगाला झाली आहे. आयोगाने पद भरती आणि परीक्षांबाबतची यापुढील कार्यवाही प्राधान्याने करण्याचे आश्वासन दिले आहे.

स्वप्निलच्या आत्महत्येच्या पार्श्वभूमीवर आयोगाचे स्पष्टीकरण म्हणून कोविडजन्य परिस्थिती तसेच सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गाच्या आरक्षणाचे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने एमपीएससीकडून झालेल्या काही परीक्षांचे निकाल लावले नव्हते, तसेच भरतीप्रक्रिया राबविण्यासाठी काही निकाल सुधारित करणे क्रमप्राप्त होते, असे कारण आयोगाकडून देण्यात आले आहे. तसेच यासाठी विविध परीक्षांसंबंधी करावयाच्या कार्यवाहीबाबत एमपीएससीने शासनाकडून सुधारित अभिप्राय मागविले होते. ते ५ जुलै रोजी शासनाकडून प्राप्त झाले असून, यापुढील कार्यवाही आयोगाकडून प्राधान्यक्रमाने करण्यात येईल, अशी प्रतिक्रिया एमपीएससी आयोगाच्या सचिवांकडून जाहीर करण्यात आली आहे.

स्वप्निल लोणकरच्या आत्महत्येनंतर तरी मागील दोन वर्षांपासून रखडलेल्या परीक्षांची प्रक्रिया पूर्ण केली जाईल, अशी एमपीएससीच्या विद्यार्थ्यांची अपेक्षा होती. मात्र १२ जुलै रोजी केवळ महाराष्ट्र वन सेवा मुख्य परीक्षा २०१९ परीक्षेतून भरल्या जाणाऱ्या सुधारित २९ पदांचा तपशील आणि महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी मुख्य सेवा परीक्षा २०१९ च्या निकाल प्रक्रियेनंतर भरावयाच्या १६ सुधारित पदांचा तपशील जाहीर करण्यात आला आहे.

अद्यापही संयुक्त पूर्व परीक्षा गट - ब या पदाची परीक्षा कधी होणार त्याची अजून तारीख घोषित नाही, त्याबाबतीत काहीच निर्णय घेण्यात आला नाही. २०२१ च्या वेळापत्रकाबाबतदेखील सामान्य प्रशासन विभागाने अद्याप आयोगास मागणी पत्रक पाठविले नाही, अशी महिती एमपीएससी स्टुडण्ट राईट्स या संघटनेकडून देण्यात आली आहे.

समितीचे काय झाले?

स्वप्निलच्या आत्महत्येनंतर सरकारने मागील आठवड्यात स्पर्धा परीक्षांमधील समस्या सोडविण्यासाठी समिती स्थापन करण्याची घोषणा केली. सहा दिवस होऊन गेले; मात्र त्याबद्दल काहीच माहिती देण्यात आली नसल्याची संतप्त प्रतिक्रिया उमेदवार व्यक्त करीत आहेत. ती समिती कोणाच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात येणार आहे, समितीमध्ये कोण सदस्य असणार? ही समिती किती दिवसांत स्थापन करणार आणि जर स्थापन करण्यात हे हाल असतील तर त्याचा अहवाल कधी सादर करणार, असे अनेक प्रश्न एमपीएससी स्टुडण्ट राईट्सचे महेश बडे यांनी उपस्थित केले आहेत.

Web Title: The commission realized the week after Swapnil's suicide

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.