Join us

रेल्वे रुळांमध्ये पाणी सोडल्यास सोसायट्यांवर बडगा, आयुक्त भूषण गगराणींच्या सूचना

By ऑनलाइन लोकमत | Published: October 09, 2024 1:48 PM

पावसाळ्यात रेल्वे रुळांवर पाणी साचल्यामुळे रेल्वेसेवा ठप्प होते. त्याचा फटका लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना बसतो.

मुंबई :

पावसाळ्यात रेल्वे रुळांवर पाणी साचल्यामुळे रेल्वेसेवा ठप्प होते. त्याचा फटका लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना बसतो. रुळांमध्ये पाणी साचण्याची अनेक कारणे असली तरी त्यातील एक महत्त्वाचे कारण म्हणजे रेल्वेमार्गालगतच्या काही गृहनिर्माण संस्था. ते त्यांच्या आवारातील पाणी उपसून रुळांमध्ये सोडतात. त्यामुळे अशा सोसायट्यांना कडक समज द्यावी. या सोसायट्यांनी एकदा सांगूनही न ऐकल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, अशा सूचना पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी दिल्या आहेत.

गगराणी यांनी सोमवारी अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त, सहायक आयुक्त, उपायुक्त तसेच विभाग अधिकारी यांच्यासोबत शहरातील विविध प्रश्नांवर आढावा बैठक घेतली. त्यात रेल्वे रुळांमध्ये पाणी साचण्याची ठिकाणे आणि त्यावरील उपाययोजना यावर चर्चा झाली.

मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, भांडुप व विद्याविहार स्थानक, सायन-माटुंगा तसेच विक्रोळी-कांजूरमार्ग दरम्यानचा रेल्वे मार्ग, हार्बर रेल्वेचा शिवडी-वडाळा मार्ग, कुर्ला स्थानक, कुर्ला-मानखुर्द मार्ग, गुरुतेगबहादूर नगर-चुनाभट्टी, कुर्ला-टिळकनगर आदी ठिकाणी पाणी साचते. रुळांखालील नाल्यांच्या प्रवाहातून गाळ काढणे, रुळांची स्वच्छता करणे आदी कामे कमीत कमी कालावधीत पूर्ण करावीत, जेणेकरून रुळांवर पाणी साचणार नाही, असे आयुक्त म्हणाले. 

पंप ऑपरेटर्सना विशेष गणवेश सखल भागांतील पाण्याचा उपसा करण्यासाठी यंदा शहर आणि उपनगरात मिळून  ४८१ ठिकाणी पंप लावले आहेत. पर्जन्य जलवाहिन्या विभागाने नेमलेल्या उपसा पंप ऑपरेटर्सना गणवेश द्यावा,  जेणेकरून त्यांची ओळख पटू शकेल, अशा सूचना आयुक्तांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. त्याचप्रमाणे पंप कार्यान्वित ठेवण्यासाठी पुरेसे इंधन असावे, याची खबरदारी बाळगावी, असेही त्यांनी नमूद केले. 

‘पालिका-रेल्वेने एकत्र काम करावे’ रेल्वेसेवा ठप्प होऊ नये, यासाठी पालिका आणि रेल्वेने एकत्रितपणे कामे करणे आवश्यक आहे. रेल्वे परिसरातील कल्व्हर्टची स्वच्छता संयुक्तपणे करणे, शिवाय रेल्वेच्या अखत्यारितील कामे केवळ पावसाळापूर्व अथवा पावसाळ्यापुरतीच मर्यादित न राहता वर्षभर सुरू राहिली पाहिजेत, असे अधिकाऱ्यांनी सुचवले.  पालिकेच्या पर्जन्य जलवाहिन्या विभाग, पूल विभाग, रस्ते विभाग, वॉर्ड यांनी सहकार्याने आणि समन्वयाने कामे पूर्ण करावीत, अशा सूचना दिल्या. 

टॅग्स :लोकलमुंबई