आयुक्त उतरणार रस्त्यावर!
By admin | Published: June 30, 2015 01:33 AM2015-06-30T01:33:49+5:302015-06-30T01:33:49+5:30
महापालिकेची धुरा हाती घेणाऱ्या प्रत्येक आयुक्तापुढे मान्सूनपूर्व तयारी हेच मोठे आव्हान असते़ मात्र अजय मेहता यांना पहिल्याच मान्सूनमध्ये नालेसफाईचा बोजवारा,
मुंबई : महापालिकेची धुरा हाती घेणाऱ्या प्रत्येक आयुक्तापुढे मान्सूनपूर्व तयारी हेच मोठे आव्हान असते़ मात्र अजय मेहता यांना पहिल्याच मान्सूनमध्ये नालेसफाईचा बोजवारा, शालेय वस्तू वाटपात लेटमार्कमुळे टीकेचे धनी व्हावे लागले आहे़ त्यामुळे आपल्या अधिकाऱ्यांवर अवलंबून न राहता खड्डे दुरुस्तीच्या पाहणीसाठी आयुक्त स्वत: रस्त्यावर उतरले आहेत़
जूनच्या दुसऱ्या आठवड्यात मुसळधार हजेरी लावून मुंबईची तुंबापुरी करणाऱ्या पावसाने खड्ड्यांची संख्याही वाढवली आहे़ विलेपार्ले ते जोगेश्वरी, कुर्ला, गोरेगाव, मालाड आणि बोरीवली हे विभाग खड्ड्यात गेले आहेत़ खड्डे भरल्यानंतरही बऱ्याच वेळा त्यासाठी वापरल्या गेलेल्या मालाच्या दर्जाबाबत साशंकता व्यक्त होते़ अनेक वेळा भरलेले खड्डे लगेचच उखडतात़ त्यामुळे या कामांची खातरजमा करण्यासाठी आयुक्तांनी पश्चिम उपनगरात पाहणी सुरू केली आहे़
त्यानुसार वांद्रे ते सांताक्रूझ या विभागातील रस्ते व पदपथांची पाहणी आज सकाळी आयुक्तांनी केली़ या पाहणी दौऱ्यात एच पूर्व विभागाचे साहाय्यक आयुक्त सत्यप्रकाश सिंग आणि एच पश्चिम वॉर्डाचे साहाय्यक आयुक्त विजय कांबळे हजर होते़ रस्ते दुरुस्त करताना दर्जेदार साहित्य वापरले जाते का? याची खातरजमा करून घेण्याची ताकीद त्यांनी अधिकाऱ्यांना या वेळी दिली़ (प्रतिनिधी)
खड्ड्यांची शंभरी
- पालिकेकडे आलेल्या तक्रारींनुसार विलेपार्ले ते जोगेश्वरी, कुर्ला, गोरेगाव, मालाड, बोरीवली या विभागांमधील रस्त्यांनी खड्ड्यांची शंभरी गाठली आहे़ म्हणजेच या विभागांमधून शंभरहून अधिक खड्ड्यांच्या तक्रारींची नोंद पालिकेकडे झाली आहे़
गॅस एजन्सीचे रस्त्यावर अतिक्रमण
- सांताक्रूझ स्थानक येथील नेहरू नगर मार्गावरील एका गॅस एजन्सीकडून रस्त्यावर व पदपथावर सायकल, रिक्षात गॅस सिलेंडर्स ठेवले जातात़ याची गंभीर दखल घेत त्यावर त्वरित कारवाई करीत तो पदपथ नागरिकांसाठी खुला करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले़ त्यानुसार तत्काळ २५ रिक्षा हटवून रस्ते व पदपथ मोकळे करण्यात आले़