मुंबई : नवनिर्वाचित मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी मंगळवारी उत्तर प्रादेशिक कार्यालयाला भेट दिली. या भेटीदरम्यान आयुक्तांनी त्यांच्या सहकाऱ्यांशी साधलेला संवाद सचिन वाझे प्रकरणानंतर खच्चीकरण झालेल्या स्कॉटलॅण्ड यार्ड अर्थात मुंबई पोलीस दलातील सहकाऱ्यांचे मनोबल वाढविण्यासाठी बूस्टर ठरू शकेल, असे मत वरिष्ठ पोलिसांकडून व्यक्त होत आहे. उत्तर प्रादेशिक विभागात दाखल झालेल्या आयुक्तांनी दहिसर पोलीस ठाण्याच्या आनंदनगर पोलीस चौकीसह नंतर नूतनीकरण केलेल्या परिमंडळ १२चे कार्यालय आणि कस्तुरबा पोलीस ठाण्यातील अंमलदारांसाठी मागाठाणे येथे बांधण्यात आलेल्या विश्रांतीगृहाचे उद्घाटन केले. त्यानंतर त्यांनी काही स्थानिक प्रतिष्ठित व्यक्तींशी संवाद साधला. कोरोनाकाळात जीव धोक्यात घालून कर्तव्य बजावणाऱ्या सर्व पोलिसांचे कौतुक करत त्यांची पाठ थोपटली आणि अधिकारी तसेच अंमलदारांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी दरबार भरविला होता. जवळपास चार तास आयुक्त या कार्यालयात होते.
दरम्यान, वरिष्ठांची एक बैठक घेऊन त्यांनी कामाचा आढावाही घेतला. अभिनेता सुशांतसिंह राजपूत ते सचिन वाझे प्रकरणादरम्यान पोलीस खात्यावर केलेल्या आरोपांमुळे ‘सुक्यासोबत ओले’ अशी अवस्था झाली आहे. त्यामुळे पोलीस आयुक्तांची ही भेट नाराज सहकाऱ्यांसाठी बूस्टर ठरू शकते, असे मत वरिष्ठ पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे. या कार्यक्रमाला सहपोलीस आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) विश्वास नांगरे पाटील, अपर पोलीस आयुक्त (उत्तर विभाग) दिलीप सावंत, परिमंडळ ११ आणि १२चे पोलीस उपायुक्त विशाल ठाकूर, डॉ. डी.एस. स्वामी तसेच सर्व पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि अन्य अधिकारी उपस्थित होते. मुंबईच्या पोलीस खात्यात झालेल्या बदलांबाबत वृत्तवाहिन्यांच्या प्रतिनिधींनी आयुक्त नगराळे यांना प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला. त्यांनी याबाबत बोलणे टाळले. समस्या सोडविण्याचा प्रयत्न मी आज पोलीस दलातील अंमलदार तसेच अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या समस्या व अडचणी जाणून घेतल्या. त्यानुसार त्या सोडविण्याचा प्रयत्न करेन. - हेमंत नगराळे, पोलीस आयुक्त, मुंबई