मुंबई : मालाड येथे राहाणाऱ्या तन्नकम कुरूप या ७८ वर्षीय वृद्धेवरील प्राणघातक हल्लाप्रकरणाची दखल पोलीस आयुक्त संजय बर्वे यांनी घेतली असली तरी अद्याप दिंडोशी पोलीस मात्र ढिम्मच असल्याचा आरोप करण्यात येत आहे. नऊ महिने उलटले तरी याबाबत दिंडोशी पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला नाही.महेंद्र नगर येथे राहाणाºया तन्नकम कुरूप यांच्या घरावर त्यांच्या शेजारी राहाणाºया स्मिता पांचाळ या महिलेने केलेल्या दगडफेकीत सून मालविकासह त्या जखमी झाल्या होत्या. मालविका मोबाईलवरून आपली छायाचित्रे काढत असल्याचा संशयावरून स्मिता पांचाळने शिवीगाळ करीत ही दगडफेक केली होती.या घटनेनंतर मोहन कृष्णन आणि स्मिता पांचाळ यांनी एकमेकांविरूद्ध तक्रारी दाखल केल्या आणि दिंडोशी पोलिसांनी दोघांविरूद्ध गुन्हे दाखल केले. आपल्या घरावर हल्ला झाला असताना पोलिसांनी आपला मुलगा मोहन कृष्णनविरूद्ध दाखल केलेला खोटा गुन्हा रद्द करून आपल्यावर हल्ला करणाºया स्मिता पांचाळ हिच्याविरूद्ध भादंवि कलम ३0७, ३२४ आणि ३२६ अन्वये गुन्हा दाखल करावा, असे निवेदन पोलिसांना दिले. पोलिसांनी तब्बल आठ महिन्यांनतर २९ एप्रिल रोजी तन्नकम कुरूप यांचा जबाब नोंदवला. तरीही अद्याप याबाबत गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.खासदार माजिद मेमन आणि खासदार हुसेन दलवाई यांनी मुख्यमंत्री व पोलीस आयुक्तांना पत्र पाठवून कारवाई करण्याची मागणी केली. पोलीस आयुक्तांनी खासदार हुसेन दलवाई यांना उत्तर प्रादेशिक विभागाच्या अतिरिक्त पोलीस आयुक्तांना हे पत्र उचित कार्यवाहीसाठी पाठवल्याचे कळवले आहे. मात्र अद्याप तरी दिंडोशी पोलिसांनी गुन्हा दाखल न केल्याने संबंधित पोलीस अधिकाºयावरच कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.
पोलीस आयुक्तांनी घेतली दखल, पण दिंडोशी पोलीस ढिम्मच
By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2019 2:19 AM