Join us

Hemant Nagrale: मुंबईचे नवे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे राज्यपालांच्या भेटीला; चर्चांना उधाण

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2021 2:06 PM

Hemant Nagrale met Governor Bhagat Singh Koshyari : आजच परमबीर सिंगांनी होमगार्डच्या मुख्यालयात हजेरी लावली आणि महासंचालक पदाचा पदभार स्वीकारला. यानंतर काही वेळातच राज्यपाल भवनाने ट्विट करून मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी सदिच्छा भेट घेतल्याचे ट्विट केले आहे.

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावा अशी आग्रही मागणी विरोधकांकडून करण्यात येत आहे. यासाठी भाजपाचे शिष्टमंडळ 24 मार्चला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या भेटीला जाणार आहे. त्या आधीच मुंबईचे नवनियुक्त पोलीस आयुक्तांनी राज्यपालांची भेट घेतल्याने चर्चेला उधाण आले आहे. (The newly appointed Commissioner of Police, Brihanmumbai Hemant Nagrale called on Governor Bhagat Singh Koshyari at Raj Bhavan, Mumbai. This was his first meeting after taking the charge as the Commissioner of Police.)

Param Bir Singh: परमबीर सिंगांनी स्वीकारली नवी जबाबदारी; 100 कोटींच्या लेटर बॉम्बचे दिल्लीपर्यंत पडसाद

सचिन वाझे (Sachin Vaze)  प्रकरण आता चांगलेच तापले आहे. मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटके ठेवल्याचे प्रकरणातून पुढे वेगळेच वळण मिळाले आहे. सचिन वाझेंची नियुक्ती कोणी केली ते मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्तांची अक्ष्यम्य चुकांमुळे उचलबांगडी या साऱ्या प्रकरणांनी आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडू लागल्या आहेत. राज्याचा राजकारणात शनिवारी रात्री भूकंप आला होता. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंगांनी  (Param Bir Singh) महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh)  यांच्यावर गंभीर आरोप असलेले पत्र मुख्यमंत्री कार्यालयाला पाठविले होते. यामध्ये निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे याला देशमुखांनी मुंबईतील पब, बार आदी आस्थापनांकडून महिन्याला 100 कोटी रुपये वसुलीचे काम दिले होते. गृहमंत्री पोलिसांवर दबाव टाकत असल्याचे परमबीर यांनी मुख्यमंत्री, शरद पवार, अजित पवारांना सांगितले होते, असा आरोप केला होता.

आजच परमबीर सिंगांनी होमगार्डच्या मुख्यालयात हजेरी लावली आणि महासंचालक पदाचा पदभार स्वीकारला. यानंतर काही वेळातच राज्यपाल भवनाने ट्विट करून मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी सदिच्छा भेट घेतल्याचे ट्विट केले आहे. राज्यपालांनी नगराळेंशी काय चर्चा केली हे समजले नसले तरीदेखील सचिन वाझे प्रकरण, अनिल देशमुखांवर 100 कोटी रुपयांच्या वसुलीचे लागलेले आरोप आणि परमबीर सिंगांचा सचिन वाझे प्रकरणात असलेला सहभाग आदी मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. 

Parambir Singh: 'जिलेटीनपेक्षा 100 कोटींची चिठ्ठी अधिक स्फोटक'; कोणत्याही क्षणी केंद्राची महाशक्ती ED ची एन्ट्री शक्य

केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर(Prakash Javdekar) यांनी राज्यसभेत तर भाजपाचे खासदार राकेश सिंह यांनी लोकसभेत (Loksabha) हा मुद्दा उचलला आहे. जावडेकर यांनी महाराष्ट्राचे गृहमंत्री वसुली करतात हे साऱ्या देशाने पाहिल्याचा आरोप केला आहे. यामुळे राज्यसभेत गदारोळ उठल्याने राज्यसभेच्या सभापतींनी हे काहीही रेकॉर्डवर घेतले जाणार नसल्याचे सांगितले. गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) ज्या पक्षाचे आहेत त्या राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad pawar) सदस्य असलेल्या राज्यसभेत (Rajya sabha) मोठा गदारोळ उडाला असून राज्यसभेचे कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले होते. राज्यसभेतच नाही तर लोकसभेतही राकेश सिंह यांनी सांगितले की, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackreay) यांनी लगेचच राजीनामा द्यावा, तसेच केंद्रीय तपास संस्थांकडून या प्रकरणाची चौकशी केली जावी अशी मागणी केली आहे.  एखाद्या एपीआयच्या समर्थनात मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेतली, त्याच एपीआयला म्हणजेच सचिन वाझेला 100 कोटी रुपयांच्या वसुलीचे लक्ष्य दिले होते. 

भाजपसह रिपाइं, वंचित बहुजन आघाडी आणि मनसेने राज्यात राष्ट्रपती राजवटीची मागणी केली आहे. राज्यपाल महोदयांनी राज्य सरकार घटनेनुसार चालत नसेल तर त्याची माहिती राष्ट्रपतींना कळवणे गरजेचे आहे, अशी आमची मागणी आहे. आम्ही राज्यपाल यांना भेटणार आहोत. राज्यपालांनी राज्याची माहिती राष्ट्रपतींना कळवावी, अशी मागणी राज्यपालांकडे करणार आहोत, असे भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले आहे. 

 

टॅग्स :हेमंत नगराळेभगत सिंह कोश्यारीभाजपामुंबई पोलीसअनिल देशमुख