लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कडक निर्बंधांच्या पहिल्याच दिवशी सकाळपासून नागरिक भाजी, किराणा खरेदीच्या नावाने मोकाटपणे वावरताना दिसले. मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी स्वतः रस्त्यावर उतरून या वेळी परिस्थितीचा आढावा घेतला. पहिल्या दिवशी पोलिसांनी नागरिकांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र पुढे कठोर पावले उचलण्यात येतील, असा इशारा दिला.
ज्या ठिकाणी कोरोना नियमांचे उल्लंघन होण्याचे प्रमाण जास्त आहे, अशी ठिकाणे निवडून पोलिसांकडून ३० एप्रिलपर्यंत कायमस्वरूपी बेरिकेट्स लावण्यात आले आहेत. त्यामुळे अशा ठिकाणी पोलिसांकडून वाहनांची झाडाझडती सुरू होती. याशिवाय गेल्या वर्षी कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव असलेल्या धारावी, वरळी, कुरार, भांडुप आदी उपनगरांसह दाट वस्ती असलेल्या भागांमध्ये बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. यात, बऱ्याच ठिकाणी वाहनांची झाडाझडती सुरू होती.
दुसरीकडे बुधवारी मुंबई पोलीस आयुक्तांनी पोलिसांना नागरिकांवर संयमाने कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. बऱ्याच ठिकाणी पोलीस नागरिकांना शांतपणे समजावून घरी पाठवत होते. मात्र याचाच फायदा काही ठिकाणी मुंबईकर घेताना दिसले. सकाळी आणि संध्याकाळच्या सुमारास विशेषत: भाजी मार्केट परिसरात नागरिकांची गर्दी पाहावयास मिळाली. विनाकारण फिरणाऱ्यांपैकी काही जणांनी मेडिकल तसेच रुग्णालयात जात असल्याचे कारण सांगून पळ काढल्याचेही पाहावयास आले. त्यामुळे पोलिसांकडून कारवाईचा फास अधिक घट्ट करण्यात येणार असल्याचे समजते. पोलीस आयुक्तांनी स्वतः प्रमुख मार्गांवर जाऊन परिस्थितीचा आढावा घेत अधिकारी, कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले.
....