ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १७ - मुदत संपली तरी खड्डे कायम असल्याने धास्तावलेले अधिकारी आज रस्त्यावर उतरले. तर अविश्वास ठरावाची टांगती तलवार असल्याने आयुक्त अजोय मेहता स्वत: नवीन रस्त्यांच्या पाहणीसाठी उन्हातान्हात फिरत असताना जी उत्तर विभागातील सर्व अभियंता व कर्मचारी आॅन ड्युटी क्रिकेटचे सामाने खेळायला गेले होते. याचे तीव्र पडसाद सर्वत्र उमटल्यामुळे आयुक्तांनी अखेर याप्रकराची चौकशी करुन अहवाल सादर करण्याचा आदेश उपायुक्तांना दिला आहे.पावसाळा संपल्यानंतरही मुंबईचे रस्ते खड्ड्यात आहेत. त्यावर मनसेचे आंदोलन, अभियंत्यांचा असहकार अशा घटनानंतर राजकीय वातावरण तापले. त्यामुळे खड्डेप्रकरणी आयुक्तांवर अविश्वास ठरावच आणण्याच्या हालचाली सुरु झाल्या. याची गंभीर दखल घेऊन आयुक्तांनी खड्डे बुजविण्यासाठी अधिकाऱ्यांना ४८ तासांची मुदत दिली. ही मुदत आज संपुष्टात येत असली तरी अनेक ठिकाणी अद्याप खड्डे कायम आहेत. त्यामुळे रस्ते व वॉर्डातील अधिकारी रस्त्यावर उतरुन खड्ड्यांची पाहणी करताना दिसले. आजपासून नव्याने सुरु होत असलेल्या शंभर रस्त्यांच्या कामांची पाहणी करण्यासाठी आयुक्तही स्वत: रस्त्यावर उतरले. मात्र जी उत्तर विभागातील सहाय्यक आयुक्त, अभियंता व कर्मचारी त्याचवेळी दादर येथील अॅन्थोनी डिसिलव्हा शाळेत क्रिकेटचे सामने खेळण्यात मश्गुल होते. हे सामने दरवर्षी होत असले तरी यावर्षी आयुक्तांच्या आदेशानुसार त्यांनी खड्डे बुजविण्यास प्राधान्य देणे आवश्यक होते. त्यामुळे नियमभंग करणाऱ्या अशा अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी राजकीय पक्षांकडून होत आहे.प्रतिनिधीचौकटखड्डे पाहणीसाठी आयुक्त रस्त्यावरपावसाळा थांबल्याने पालिकेने तीनशे नवीन रस्त्यांची कामं आॅक्टोबर अखेरीपर्यंत सुरु करण्याचा निर्धार केला आहे. असे एकूण १००१ रस्त्यांची कामं होणार आहेत. या कामाची सुरुवात आजपासून झाली आहे. आयुक्तांनी पश्चिम उपनगरांतील काही रस्त्यांची आज पाहणी केली. यात स्वामी विवेकानंद मार्गावरील वांद्रे फायर ब्रिगेड शेजारील रस्ता, प. द्रुतगती महामार्गाला जोडणारा विलेपार्ले पूर्व येथील श्रद्धानंद मार्ग, अंधेरी पूर्वेकडील गोखले पुलापर्यंतचा ना.सी.फडके मार्ग आणि अंधेरी पूर्वेकडील अच्युतराव पटवर्धन मार्ग यांचा समावेश आहे. तसेच या पाहणीदरम्यान, एच पूर्व आणि पश्चिम, के पूर्व आणि पश्चिम आणि पी दक्षिण या विभागातील खड्डे बुजविण्याच्या कामांची पाहणी केली. उपायुक्त रमेश पवार, वसंत प्रभू आणि रस्ते विभागाचे प्रमुख अभियंता संजय दराडेही खड्ड्यांची पाहणी करीत होते. खड्डे बुजविण्यास मनसे मुदतवाढखड्डे बुजविण्याचे काम ४८ तासांमध्ये होणे शक्य नाही. दिवाळीपर्यंत खड्डे बुजविण्याची मुदत महापालिकेला दिली आहे. त्यानंतर मात्र मुंबई खड्ड्यात असल्यास पूर्वी दिलेल्या इशाऱ्याप्रमाणे आयुक्तांनाच खड्ड्यात उभे करु, असा इशारा मनसेचे गटनेते संदीप देशपांडे यांनी दिला आहे. तसेच प्रमुख अभियंत्यांना खड्ड्यात उभे केल्यामुळे अधिकाऱ्यांना लाज वाटली होती. मग आता खड्डे बुजविण्याचे सोडून क्रिकेट खेळताना त्यांना लाज वाटत नाही का?याप्रकरणी संबंधितांवर कारवाई झालीच पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली आहे. चौकशीचे आदेशआयुक्तांचे आदेश डावलून क्रिकेट खेळणाऱ्या अधिकाऱ्यांनी पालिकेचा नियमभंग केला आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाईची मागणी होत आहे. आयुक्तांनीही याप्रकरणी उपायुक्त आनंद वाघ्राळकर यांना चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यांच्या अहवालानंतर आॅन ड्युटी क्रिकेट खेळणाऱ्या या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार आहे.