सेवा धोक्यात येण्याची आयुक्तांना तंबी; नवी मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नागराळे अडचणीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2018 06:56 AM2018-02-25T06:56:38+5:302018-02-25T06:56:38+5:30
नवी मुंबईचे दिवंगत विकासक सुनील लाहोरिया यांचा मुलगा संदीप लाहोरिया यांचे पोलीस संरक्षण काढून घेतल्याप्रकरणी, उच्च न्यायालयाने त्यांना नवी मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नागराळे यांची भेट घेऊन, त्यांच्यासमोर बाजू मांडण्याचे निर्देश दिले होते.
मुंबई : नवी मुंबईचे दिवंगत विकासक सुनील लाहोरिया यांचा मुलगा संदीप लाहोरिया यांचे पोलीस संरक्षण काढून घेतल्याप्रकरणी, उच्च न्यायालयाने त्यांना नवी मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नागराळे यांची भेट घेऊन, त्यांच्यासमोर बाजू मांडण्याचे निर्देश दिले होते. मात्र, त्यांची बाजू ऐकण्याऐवजी नागराळे यांनी उच्च न्यायालयाच्या आदेशाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केले. याची दखल घेत, उच्च न्यायालयाने नवी मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नागराळे यांना लेखी माफी मागण्याचा आदेश शनिवारी दिला, तसेच या गैरवर्तणुकीमुळे उरलेली सेवा धोक्यात येऊ शकते, असा इशाराही उच्च न्यायालयाने नागराळे यांना दिला.
सुनील लाहोरिया यांच्या हत्या प्रकरणात महत्त्वाचा साक्षीदार हा त्यांचा मुलगा संदीप लाहोरिया हाच आहे. संदीप यांच्या जिवाला धोका असल्याची खात्री करूनच, पोलिसांनी त्यांना पोलीस संरक्षण दिले. मात्र, २१ जानेवारी रोजी नवी मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नागराळे यांनी लाहोरिया यांना नोटीस बजावून, त्यांचे पोलीस संरक्षण काढून घेतले. लाहोरिया यांनी पोलीस संरक्षणाचे पैसे न भरल्याने, हे संरक्षण काढल्याचे नागराळे यांनी नोटीसमध्ये म्हटले आहे.
संदीप यांच्या जिवाला धोका असतानाही, लाहोरिया यांची बाजू न ऐकताच, नवी मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नागराळे यांनी त्यांचे पोलीस संरक्षण काढून घेतले. त्यामुळे त्यांचा हा निर्णय रद्द करण्यात यावा, यासाठी लाहोरिया यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. या याचिकेवरील सुनावणी न्या. भूषण गवई व न्या. बी. पी. कुलाबावाला यांच्या खंडपीठापुढे होती. गेल्या सुनावणीत न्यायालयाने संदीप लाहोरिया यांना पोलीस आयुक्तांची भेट घेऊन त्यांची बाजू मांडण्याचे निर्देश दिले. लाहोरिया यांनी नागराळे यांची भेट घेतली. मात्र नागराळे यांनी लाहोरिया यांची बाजू ऐकण्याऐवजी त्यांनी न्यायालयाच्या आदेशाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याची बाब, निझाम यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणली.
२७ फेब्रुवारीपर्यंत मुदत
‘आयुक्तांच्या गैरवर्तनाबद्दल त्यांची पोलीस दलातील उरलेली सेवा धोक्यात येईल,’ अशी तंबीही न्यायालयाने या वेळी नागराळे यांना दिली, तसेच नागराळे यांना लेखी माफी मागण्यासाठी २७ फेब्रुवारीपर्यंत न्यायालयाने मुदत दिली.
संवादाची सीडी सादर करण्याचे निर्देश
नागराळे यांनी आदेश न मानून न्यायालयाचा अनादर केला आहे, असे निझाम यांनी सांगितले. त्यावर न्यायालयाने संताप व्यक्त करत, याचिकाकर्त्यांच्या वकिलांना या संवादाची सीडी पुढील सुनावणीत सादर करण्याचे निर्देश दिले.
न्यायालयाची लेखी माफी मागा
या प्रकाराबद्दल आयुक्तांनी न्यायालयाची लेखी माफी मागावी. न्यायालयाच्या आदेशाचा आदर करायला सांगा, अन्यथा अशा लोकांना कसे हाताळायचे,
हे आम्हाला माहीत आहे, असे म्हणत, न्यायालयाने सरकारी वकिलांना नागराळे यांना समज देण्याची सूचना केली.
नागराळे यांची सीबीआय चौकशी करण्याचे संकेत न्यायालयाने दिले. ‘याचिकाकर्त्याने सीडी दाखल केल्यानंतर, नागराळे यांचे व्हॉइस सॅम्पल घेऊन चौकशी करण्याचे संकेतही न्यायालयाने या वेळी दिले.