मुंबई : फेरीवाल्यांवर कारवाई करण्याची मुदत संपल्यानंतर आक्रमक भूमिका घेणा-या मनसेच्या पदाधिका-यांनी महापालिका आयुक्त अजय मेहता यांची सोमवारी भेट घेतली. महापालिका आणि रेल्वे प्रशासन फेरीवाल्यांवर लवकरच संयुक्त कारवाई करणार असल्याचे आयुक्तांनी या शिष्टमंडळाकडे स्पष्ट केले. तरीही या कारवाईचा प्रभाव दिसेपर्यंत खळ्ळखट्याक् सुरूच ठेवण्याचा इशारा मनसेने दिला आहे.एल्फिन्स्टन रोड स्थानकाच्या पुलावर २९ सप्टेंबर रोजी चेंगराचेंगरी होऊन २३ मुंबईकर मृत्युमुखी पडले होते. या दुर्घटनेनंतर मनसेने आक्रमक होत संताप मोर्चा काढला होता. त्या वेळी १५ दिवसांत अनधिकृत फेरीवाल्यांना हटवा अन्यथा १६व्या दिवशी मनसे हे काम करेल, असा इशारा मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला होता. मात्र ही मुदत संपल्यानंतरही फेरीवाले जैसे थे आहेत. सांताक्रुझ येथील अनधिकृत फेरीवाल्यांना मनसेच्या खळ्ळखट्याक्चा सामना करावा लागला. फेरीवाल्यांना मारहाण करून त्यांच्या साहित्याची नासधूस करण्यात आली. या प्रकारानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांवर गुन्हाही नोंद झाला आहे. या कारवाईच्या पार्श्वभूमीवर मनसेच्या नेत्यांनी सोमवारी सायंकाळी आयुक्तांची भेट घेऊन फेरीवाल्यांना हटवण्याची मागणी केली.>मनसे कारवाई सुरूच : मनसेच्या शिष्टमंडळाने पोलीस आयुक्तांची भेट घेऊन फेरीवाल्यांवर कारवाईची मागणी केली. मात्र पालिका आणि पोलिसांची संयुक्त कारवाई प्रभावीपणे सुरू होईपर्यंत मनसैनिक आपल्या पद्धतीने फेरीवाले हटवण्याचे आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचे मनसेने स्पष्ट केले आहे
कारवाईचा प्रभाव दिसेपर्यंत खळ्ळ खट्याक् सुरू राहणार, फेरीवाला कारवाईबाबत आयुक्तांची घेतली भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2017 2:37 AM