आयुक्तांनी अधिकाऱ्यांना घेतले फैलावर

By admin | Published: June 4, 2017 03:11 AM2017-06-04T03:11:49+5:302017-06-04T03:11:49+5:30

पावसाळीपूर्व कामांच्या दोन डेडलाइन उलटल्या, तरी नालेसफाई आणि रस्त्यांची कामे अर्धवट आहेत. विरोधकांनी पाहणी दौऱ्यातून याचा पर्दाफाश केल्यामुळे अधिकाऱ्यांचे

The Commissioner took the extension | आयुक्तांनी अधिकाऱ्यांना घेतले फैलावर

आयुक्तांनी अधिकाऱ्यांना घेतले फैलावर

Next

- लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : पावसाळीपूर्व कामांच्या दोन डेडलाइन उलटल्या, तरी नालेसफाई आणि रस्त्यांची कामे अर्धवट आहेत. विरोधकांनी पाहणी दौऱ्यातून याचा पर्दाफाश केल्यामुळे अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. सक्त इशारा देऊनही कामे होत नसल्याने प्रशासनही संतप्त आहे. याचे पडसाद मासिका आढावा बैठकीत शनिवारी उमटले. पावसाळ्यात रस्त्यावर विशेषत: मेट्रो रेल्वेचे काम सुरू असलेल्या ठिकाणी पाणी तुंबणार नाही, याची खबरदारी घेण्यास आयुक्तांनी सहायक आयुक्तांना ठणकावले.
दरवर्षी पावसाळीपूर्व कामे करण्यासाठी ३१ मे ही डेडलाइन निश्चित करण्यात येते. ही डेडलाइन चुकली, तरी काही दिवसांत कामे पूर्ण करून घेण्यात येतात. मात्र, दोन वर्षांपूर्वी रस्ते आणि नालेसफाईच्या कामातील भ्रष्टाचार उघड झाला. यामुळे घोटाळेबाज ठेकेदारांना पालिकेने बाहेरचा रस्ता दाखवला, तसेच घोटाळ्याचा मार्ग बंद करण्यासाठी काही कठोर पावले उचलण्यात आली. यामुळे ठेकेदारांनी नालेसफाईकडे पाठ फिरवली, तर खडीचा तुटवडा निर्माण झाल्याने रस्त्यांची कामे ठप्प झाली.
परिणामी, ३ जून उलटूनही कामे अर्धवट आहेत. याचा आढावा घेताना आयुक्त अजय मेहता यांनी सर्व सहायक आयुक्तांना धारेवर धरले. पावसाचे पाणी नेहमी भरण्याचा इतिहास असलेल्या ठिकाणी सर्व विभागात सुमारे अडीच हजार कर्मचारी गणवेषात कर्तव्यावर उपस्थित राहतील, याची खबरदारी घ्यावी. रस्त्यांच्या ठेकेदारांची तातडीने बैठक घेऊन त्यांच्याकडील साधनसामुग्री, मनुष्यबळ व एकूण क्षमतेचा आढावा घ्यावा. त्यांचे संपर्क क्रमांक संबंधित सहायक आयुक्तांना देण्याच्या सूचना या बैठकीत दिल्या.

येथे घ्यावी लागणार काळजी
पावसाळ्याच्या काळात मॅनहोल उघडे असणे, झाडे पडणे, दगड कोसळणे धोकादायक इमारती पडणे, अशा दुर्घटनामुळे जीवितहानी व वित्तहानी होऊ नये, यासाठी विशेष काळजी घेण्याच्या सूचना आयुक्तांनी या बैठकीत दिल्या.

चर तीन दिवसांत बुजवणार
या वर्षी १ आॅक्टोबर २०१६ ते ३१ मे २०१७ पर्यंत ३७८.१२ किलोमीटर लांबीचे चर खोदण्याची परवानगी विविध आस्थापनांना महापालिकेच्या वतीने देण्यात आली होती. यापैकी ३६९.६० किलोमीटरचे चर काम झाल्यानंतर, संबंधित रस्ते पूर्ववत व वाहतूक योग्य करण्यात आले आहेत. उरलेले ८.६० किलोमीटरचे चर येत्या तीन दिवसांत पूर्ववत करण्यात येणार आहेत.

मेट्रोच्या खोदकामाची पालिकेला डोकेदुखी
सध्या मुंबईत मेट्रोची कामे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. मेट्रोची कामे सुरू असल्याच्या ठिकाणी पाणी तुंबणार नाही, याकडे विशेष
लक्ष देण्याचे आदेश आयुक्तांनी सर्व सहायक आयुक्तांना दिले आहेत.

Web Title: The Commissioner took the extension

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.