मुंबई : शालेय वस्तू वाटपाला दिरंगाई होत असल्याने विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात रक्कम जमा करण्याचा निर्णय घेऊन अडचणीत आलेले आयुक्त अजय मेहता यांनी आता स्थायी समितीचा रोष ओढवून घेतला आहे़ नालेसफाईचा अहवाल स्थायी समितीला सादर करण्याऐवजी पालिकेच्या संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आल्याने संतप्त सर्वपक्षीय सदस्यांनी आजची बैठक झटपट तहकूब केली़ त्यामुळे आयुक्त विरुद्ध नगरसेवक असा नवीन वाद पेटण्याची चिन्हे आहेत़मुंबईत पाणी तुंबण्यावरून पालिकेची गेल्या आठवड्यातील महासभा गाजली़ त्यामुळे नालेसफाईची चौकशी एका आठवड्यात पूर्ण करून दोषींविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन आयुक्तांनी सभागृहात दिले होते़ त्यानुसार आज हा चौकशी अहवाल स्थायी समितीपुढे सादर होणार होता़ मात्र गोपनीय असलेला हा अहवाल थेट पालिकेच्या संकेतस्थळावरच प्रसिद्ध झाला़ याची कुणकुण सदस्यांना लागताच स्थायी समिती सदस्यांनी तीव्र संताप व्यक्त करीत सभा झटपट तहकूब करण्याची मागणी केली़ विरोधी पक्षनेते देवेंद्र आंबेरकर यांनी आणलेल्या तहकुबीचे विरोधी पक्षांसह सत्ताधारी शिवसेना-भाजपा सदस्यांनीही समर्थन केले़ समितीपुढे सादर होण्यापूर्वी हा अहवाल प्रकाशित करून स्थायी समितीलाच आयुक्तांनी आव्हान दिले असल्याची नाराजी सदस्यांनी व्यक्त केली़ आयुक्तांचा हा मनमानी कारभार म्हणजे स्थायी समितीच्या अधिकारांवर गदा असल्याचा रोष व्यक्त करीत सर्वपक्षीय सदस्यांनी बैठक झटपट तहकूब केली़ (प्रतिनिधी)
स्थायी समितीला आयुक्तांचे आव्हान
By admin | Published: July 02, 2015 4:27 AM