Join us

वृद्धेवरील अन्यायाची आयुक्तांकडून दखल

By admin | Published: August 24, 2015 1:00 AM

एका वृद्धेला घरफोडीच्या गुन्ह्यातील पूर्ण ऐवज देण्यात पोलिसांकडून होत असलेली टाळाटाळ आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून त्याबाबत झालेल्या

मुंबई : एका वृद्धेला घरफोडीच्या गुन्ह्यातील पूर्ण ऐवज देण्यात पोलिसांकडून होत असलेली टाळाटाळ आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून त्याबाबत झालेल्या अपमानास्पद वागणुकीची दखल अखेर पोलीस आयुक्त राकेश मारिया यांनी घेतली आहे. परिमंडळ-६चे पोलीस उपायुक्त संग्रामसिंह निशानदार व शिवाजी नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक बाळासाहेब जाधव यांना २५ आॅगस्टला पोलीस आयुक्तालयात चौकशीसाठी पाचारण करण्यात आले आहे.गोवंडीतील ६० वर्षांच्या मंगलाबेन सावला यांच्यावर पोलिसांकडून होत असलेल्या अन्यायाबाबत ‘लोकमत’ने १८ आॅगस्टला वाचा फोडली होती. त्यानंतर मारिया यांनी गुरुवारी फिर्यादीकडून घडलेल्या प्रकाराची माहिती घेतली. उपायुक्त निशानदार यांनी शिवीगाळ करीत कार्यालयातून हाकलून लावले होते, चोरट्यांकडून मिळविलेला ऐवज तुम्ही सीपी साहेबांकडूनच घ्या, असेदेखील उद्धटपणे सांगितले होते. त्यामुळे आयुक्त आता फिर्यादींच्या समोरच त्यांच्याकडून तपासकामाची माहिती घेणार आहेत. १९ जानेवारीला मध्यरात्री सावला यांच्या घरातील कपाटाचे कुलूप तोडून चोरट्यांनी रोख ८८ हजारांसह १७ तोळे सोने व चांदीचे दागिने आणि अन्य साहित्य लंपास केले. त्याबाबत शिवाजी नगर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यास गेले असता पोलिसांनी दागिन्याचे बिल असल्याशिवाय इतक्या किमतीची चोरी दाखविता येत नाही, असे सांगितले. त्यानंतर केवळ साडेसात तोळे व रोख रक्कम चोरीला गेल्याची फिर्याद घेतली. या प्रकरणी पोलिसांनी १८ फेबु्रवारीला दोघांना अटक करून चोरीतील ऐवज जप्त केला. त्यानंतर तपास अधिकारी भाट यांच्याकडून चोराकडून वसूल केलेल्यापैकी सोने-चांदीचे दागिने घेण्यासाठी बोलावून घेतले. मात्र त्यांच्याकडून पूर्ण ऐवज न देता निम्मा ऐवज स्वीकारण्यासाठी दबाव टाकण्यात येत आहे. (प्रतिनिधी)