हिरे व्यावसायिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी कटिबद्ध
By Admin | Published: March 19, 2017 03:32 AM2017-03-19T03:32:05+5:302017-03-19T03:32:05+5:30
वस्तू- सेवा कर (जीएसटी) प्रणालीमुळे राज्यातील हिरे उद्योगामध्ये काही प्रमाणात अडचणी निर्माण होणार असल्यातरी त्या दूर करण्यासाठी राज्य सरकार कटिबध्द आहे,
मुंबई : वस्तू- सेवा कर (जीएसटी) प्रणालीमुळे राज्यातील हिरे उद्योगामध्ये काही प्रमाणात अडचणी निर्माण होणार असल्यातरी त्या दूर करण्यासाठी राज्य सरकार कटिबध्द आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी येथे केले.
जीम अॅण्ड ज्वेलरी एक्सपोर्ट प्रमोशन कौन्सिल (जीजेईपीसी)च्या वतीने आयोजिलेल्या इंडिया जीम अॅण्ड ज्वेलरी अॅवॉर्ड (आयजीजेए) २०१६ पुरस्काराचे वितरण हॉटेल ट्रायडंट येथे करण्यात आले. त्यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. ‘जीजेईपीसी’च्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त या व्यवसायातील ५० मान्यवरांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यामध्ये ज्येष्ठ उद्योजक शेवंतीभाई लाल यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. परिषदेचे अध्यक्ष प्रवीणशंकर पांड्या, उपाध्यक्ष रसेल मेहता, समन्वयक किरीट भंसाळी, ज्युरी मेंबर निरुपा भट्ट, एस.के. मिश्रा आदी प्रमुख उपस्थित होते.
‘आयजीजेए’ हा देशातील दागिन्यांच्या क्षेत्रातील एक अग्रगण्य पुरस्कार समजला जातो. त्याबाबत ‘ जीजेईपीसी’ च्या कार्याचे कौतुक करुन मुख्यमंत्री म्हणाले, या ज्वेलरी व हिरे उद्योगाने महाराष्ट्र व मुंबईला मोठा लौकिक मिळवून दिला आहे. या उद्योगातून मोठ्या प्रमाणात परकीय चलन, रोजगार निर्मिती होते, त्यामुळे हा उद्योग आमच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा आहे. त्यामुळे त्याच्या वृद्धीसाठी आम्ही संघटनेच्या ठामपणे पाठीशी राहू. जीएसटी करप्रणाली लागू होण्यामुळे या उद्योगामध्ये काही प्रश्न उपस्थित होणार असले तरी ते सोडविण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू.’ यावेळी संघटनेचे अध्यक्ष प्रवीणशंकर पांड्या यांनी २७३ हजार कोटीचा टप्पा या उद्योगाने पार केला असल्याचे सांगितले. (प्रतिनिधी)