पोलीस दलाला अत्याधुनिक सुविधांचे पाठबळ देण्यासाठी वचनबद्ध- मुख्यमंत्री
By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2020 04:37 AM2020-01-03T04:37:20+5:302020-01-03T04:37:45+5:30
अत्याधुनिक साधनांचा वापर करणाऱ्या विघातक शक्तींचा बीमोड करण्यासाठी एक पाऊल पुढे राहणे गरजेचे
मुंबई : बदलत्या काळानुसार पोलिसांपुढील आव्हाने वाढत आहेत. विघातक शक्ती अत्याधुनिक साधने वापरू लागली आहे. त्यांचा बीमोड करण्यासाठी पोलिसांनाही एक पाऊल पुढे राहणे गरजेचे आहे. त्यासाठी महाराष्ट्र पोलीस दलाला सर्वोत्तम प्रशिक्षण, अत्याधुनिक सुविधांचे पाठबळ दिले जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिनानिमित्त आयोजित संचलन समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
मरोळ येथील पोलीस प्रशिक्षण केंद्र येथील मैदानात गुरुवारी आयोजित करण्यात आलेल्या या समारंभात पोलीस दलातील विविध विभागांच्या पथकांनी संचलन करून मानवंदना दिली. सुरुवातीला राज्य राखीव पोलीस दल, महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनी, मुंबई पोलीस यांच्यासह विविध पथकांनी बंदुकीच्या हवेत फैरी झाडून सलामी दिली. परेड कमांडर पोलीस उपायुक्त अखिलेश कुमार सिंह यांच्या नेतृत्वात संचलन केले. या संचलनात राज्यातील विविध जिल्ह्यांतून आलेल्या पोलीस वाद्यवृंद पथकांनी संस्मरणीय अशा धून सादर केल्या. तर विशेष सुरक्षा विभागाने अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षेशी निगडित प्रात्यक्षिके सादर केली.
महाराष्ट्र पोलीस दलाच्या इतिहासात प्रथमच ध्वजप्रदान दिनानिमित्त असे संचलन करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. या पहिल्याच संचलनात मानवंदना स्वीकारण्याची संधी मिळाल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी हा क्षण आयुष्यातील अनमोल ठेवा बनल्याचे सांगितले.
मुख्यमंत्री म्हणाले की, पोलिसांना ताणतणाव स्वीकारून, इतरांना निर्धास्त करावे लागते. पोलिसांच्या सजगतेमुळेच सरत्या वर्षाला निरोप आणि नव्या वर्षाचे स्वागत निर्धास्तपणे केले. बदलत्या कालानुरूप विघातक शक्ती अत्याधुनिक गोष्टी वापरू लागल्या आहेत. त्यांच्याशी दोन हात करण्यासाठी पोलिसांना एक पाऊल पुढे राहावे लागेल. यासाठी जगात उपलब्ध असे सर्वोत्तम प्रशिक्षण आणि सुविधा पोलिसांना मिळवून देण्याचा प्रयत्न असेल. सुविधांच्या रूपाने पाठबळ दिले जाईल. त्यातून त्यांनी हिंमत कमवावी अशी अपेक्षा आहे. या हिमतीमुळेच शिवरायांच्या महाराष्ट्राची मान आणखी उंचावता येईल. म्हणूनच पोलीस दलाला पाठबळ देण्यासाठी वचनबद्ध असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
संचलनास मंत्री आदित्य ठाकरे, आमदार रमेश लटके, गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव संजय कुमार, पोलीस महासंचालक सुबोधकुमार जायसवाल, मुंबईचे पोलीस आयुक्त संजय बर्वे यांच्यासह पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते.
पोलिसांसाठी घरे उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न
महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळाच्यावतीने मुंबई पोलीस दलातील अधिकारी, कर्मचारी यांच्यासाठी बांधण्यात येणाºया मरोळ येथील निवासस्थानाच्या प्रकल्पाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले.
या प्रकल्पात प्रशासकीय इमारत, विश्रांतीगृह, वसतिगृह, क्रीडासंकुल यांच्यासह सर्व सुविधायुक्त ४४८ सदनिकांचे बांधकाम करण्यात येणार आहे. यासाठी तळमजल्यासह सात मजल्यांच्या सोळा इमारती उभारण्यात येणार आहेत. त्यासाठी सुमारे २२५ कोटी १३ लाख रुपयांची तरतूद केली आहे. पोलिसांसाठी जास्तीत जास्त घरे उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी या वेळी सांगितले.