गॅसगळती शोधण्यासाठी १६ सदस्यांची समिती
By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2019 04:50 AM2019-09-22T04:50:01+5:302019-09-22T04:50:15+5:30
उपायांची करणार शिफारस; पालिका, आयआयटी, एनडीआरएफच्या प्रतिनिधींचा समावेश
मुंबई : दोन दिवसांपूर्वी मुंबईतील विविध भागात झालेल्या गॅसगळतीचा शोध अद्याप लागलेला नाही. त्यामुळे या गॅसगळतीचा उगम, त्याचे कारण शोधण्यासाठी १६ सदस्यांची समिती नियुक्त करण्यात आली आहे. या समितीमध्ये महापालिका, आपत्कालीन कक्ष, आयआयटी, एनडीआरएफ आणि गॅस कंपन्यांमधील प्रतिनिधींचा समावेश आहे. ही समिती पुढील काही दिवसांमध्ये गॅसगळतीचे गूढ उकलून आपला अहवाल सादर करणार आहे. गळतीबाबत अनेक तक्रारी आल्या; मात्र गळती नेमकी कुठे झाली? भविष्यात अशी गळती झाल्यास कोणती काळजी घेता येईल? तसेच गळती होऊ नये यासाठी कोणत्या प्रतिबंधक उपाययोजना करता येतील? याबाबत ही समिती शिफारस करणार आहे.
मुंबईत गुरुवारी रात्री अचानक गॅसगळतीच्या तक्रारी विविध भागांतून येऊ लागल्या. पालिकेचा आपत्कालीन नियंत्रण कक्ष आणि पोलिसांकडे मोठ्या प्रमाणात तक्रारी आल्या. सोशल मीडियाद्वारे ही खबर सर्वत्र वाऱ्यासारखी पसरली. ज्यामुळे मुंबईत भीतीचे वातावरण पसरले होते. दरम्यान, अग्निशमन दल, पालिकेचे पथक, महानगर गॅस कंपनी आदी सर्वांनी गॅसगळतीच्या तक्रारी आलेल्या ठिकाणी जाऊन पाहणी केली. परंतु, कुठल्याही यंत्रणेच्या तपासणीत गॅसगळती आढळली नाही. गॅसगळती झाली का? झाली तर नेमकी कुठून झाली? याबाबत अद्याप शोध लागलेला नाही. तरीही या तक्रारींची गंभीर दखल पालिका प्रशासनाने घेतली आहे.
आपत्कालीन नियंत्रण कक्षाची जबाबदारी असलेल्या अतिरिक्त पालिका आयुक्त अश्विनी जोशी यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी दुपारी बैठक झाली. या बैठकीत पोलीस प्रशासन, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथक, आयआयटी, महानगर गॅस, एचपीसीएल, निरी, ओएनजीसी, टाटा, आरसीएफ आणि अग्निशमन दलामधील प्रतिनिधी उपस्थित होते. या सर्व प्राधिकरणांमधील प्रतिनिधींचा समावेश असलेली
१६ सदस्यांची समिती स्थापन करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. तीन दिवसांमध्ये या गॅसगळतीचा अहवाल देऊन प्रत्यक्षात गळती झाली होती का? झाली तर नेमकी कुठून झाली? त्यावर उपाय काय? भविष्यात असा प्रकार कसा टाळता येईल? यावर ही समिती मार्गदर्शन करणार आहे.
समिती या गोष्टींचा घेणार शोध
इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ मेटेओरॉलॉजी सायन्सच्या साहाय्याने ११ प्रकारच्या गॅसगळतीची तपासणी केली जाणार आहे.
या समितीची पुढील बैठक २६ सप्टेंबर रोजी होणार आहे.
ही समिती आपल्या अहवालात त्या दिवशी मुंबईत नक्की गॅसगळती झाली होती का? नेमकी कुठे झाली? गळतीची कारणे काय? याचा शोध घेणार आहे.