मुंबई : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला संविधानाच्या चौकटीत आणण्याची बहुजन वंचित आघाडीची मागणी काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाला मान्य आहे का, असा थेट सवाल करतानाच हा राज्यपातळीवरील निर्णय नाही. संघाबाबतचा मसुदा तयार करण्यासाठी काँग्रेसच्या महाआघाडीतील घटकपक्षांतील कायदेतज्ज्ञांची समिती स्थापन करण्याची मागणीही भारिप नेते प्रकाश आंबेडकर यांनी केली, तसेच टोलवाटोलवीचे राजकारण थांबविण्याचा इशारा काँग्रेसला दिला.संघाला संविधानाच्या कक्षेत आणण्याचा मसुदा दिल्यास काँग्रेससोबत जाण्याची घोषणा प्रकाश आंबेडकर यांनी वारंवार केली होती. यावर आपणच तसा मसुदा द्या, असे लेखी पत्र काँग्रेस आघाडीकडून राधाकृष्ण विखे पाटील आणि राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी २८ फेब्रुवारीला पाठविले होते. त्यांच्या या पत्राला प्रकाश आंबेडकर यांनी सविस्तर उत्तर पाठविले. संघाला संविधानाच्या कक्षेत आणण्याची बहुजन वंचित आघाडीची मागणी केंद्रीय काँग्रेसला मान्य आहे का, त्यांची या मागणीबाबत काय भूमिका आहे, असा थेट सवाल प्रकाश आंबेडकर यांनी केला. संघाबाबतची वंचित बहुजन आघाडीची मागणी गांभीर्याने घेतली गेली नसल्याचा आरोप करतानाच काँग्रेसकडे वकिलांची फौज असताना त्यांच्याकडून मार्गदर्शन घेतले नाही. उलट मलाच उपाय विचारणे म्हणजे चेंडू माझ्या कोर्टात ढकलण्यासारखे आहे. या प्रश्नावर राजकारण न करता काँग्रेसमधील विधिज्ञांचा सल्ला हाच प्राथमिक मसुदा म्हणून चर्चेला घेत पुन्हा एकदा आघाडीच्या चर्चेला सुरुवात करता येईल, असेही ते म्हणाले.काँग्रेससोबत आघाडी झाली पाहिजे, हीच भूमिका आम्ही वारंवार मांडली. गेल्या वर्षी जुलैमध्ये आम्ही ही भूमिका घेतली त्यानंतर सप्टेंबरपर्यंत काँग्रेसने प्रतिसादच दिला नाही. एमआयएमसोबत आम्ही आघाडी केली. ओवेसींना रझाकारांचा पक्ष म्हणून विरोध करताना देशाची फाळणी करणाऱ्या मुस्लीम लीगशी आणि महाराष्ट्रात भाजपा सरकारला टेकू देणाऱ्या राष्ट्रवादीशी काँग्रेसने आघाडी केल्याची आठवणही आंबेडकर यांनी पत्रात केली. संघाबाबतची भूमिका स्पष्ट केल्यास निवडणुकीच्या आखाड्यातून बाजूला होण्याची घोषणा ओवेसी यांनी जाहीर सभेत केली. त्यामुळे त्यांच्या नावावर राजकारण करू नका, असेही ते म्हणाले. छोट्या पक्षांना शेवटच्या दिवसापर्यंत खेळवत ठेवायचे आणि निवडणुकीतून बाद करायचे ही काँग्रेस नेत्यांची खेळी आपण अन्य राज्यात पाहिली आहे. त्यामुळे धर्मनिरपेक्ष पक्षांची मोट बांधण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करण्याचे आवाहनही त्यांनी केले. पहिल्या बैठकीत मांडलेल्या तीन मुद्द्यांवर उत्तर दिले नाहीत. उलट अनौपचारिक बैठकीतील चर्चेनंतर दोनपेक्षा एकही जागा जादा सोडणार नसल्याच्या बातम्या काँग्रेसने पेरल्याचा आरोपही आंबेडकर यांनी पत्रात केला.>प्रश्न केवळ जागेचा नाहीगांधीवादावर चालणारा काँग्रेस पक्ष हिंदुत्ववादी बनू लागतो, तेव्हा या देशातील धर्मनिरपेक्षतेची जागा संकुचित होऊ लागते. संविधान निर्मितीत काँग्रेसचे मोठे योगदान आहे. आज संविधानाला सर्वांत मोठे आव्हान निर्माण झाले असताना, संघासारख्या संघटनांना संविधानाच्या चौकटीत आणण्याची चर्चाही व्यापक पातळीवर करायला काँग्रेस तयार नाही, असा आरोप आंबेडकर यांनी केला.
संघाबाबत कायदेतज्ज्ञांची समिती नेमा - प्रकाश आंबेडकर
By ऑनलाइन लोकमत | Published: March 05, 2019 4:30 AM