वृक्ष लागवडीच्या चौकशीसाठी आमदारांची समिती
By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2021 05:10 AM2021-03-11T05:10:55+5:302021-03-11T05:12:07+5:30
वृक्ष लागवड मोहिमेवर २५०० कोटी रुपये खर्च करूनही झाडे जळत असतील तर त्याची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी विधानसभेत आमदारांनी केली होती
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्यात देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात झालेल्या ३३ कोटी वृक्ष लागवडीच्या विशेष मोहिमेची चौकशी करण्यासाठी १६ आमदारांच्या विधिमंडळ समितीची घोषणा वने राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी बुधवारी विधानसभेत केली. भरणे हे या समितीचे अध्यक्ष असतील आणि येत्या चार महिन्याच्या आत समिती सभागृहाला अहवाल सादर करेल. या मोहिमेवर किती खर्च झाला, किती झाडांचे संगोपन झाले या बाबत आ.रमेश कोरगावकर यांनी गेल्या आठवड्यात विधानसभेत प्रश्न विचारला होता.
वृक्ष लागवड मोहिमेवर २५०० कोटी रुपये खर्च करूनही झाडे जळत असतील तर त्याची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी विधानसभेत आमदारांनी केली होती. त्यावर, विधिमंडळ समितीमार्फत चौकशीचे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यांनी दिले होते.
त्यानुसार भरणे यांनी शुक्रवारी निवेदनाद्वारे समितीतील सदस्यांची नावे जाहीर केली. त्यात भरणे यांच्यासह सुनील प्रभू, उदयसिंग राजपूत, बालाजी किणीकर (शिवसेना), अशोक पवार, माणिकराव कोकाटे, सुनील भुसारा, शेखर निकम (राष्ट्रवादी), नाना पटोले, सुभाष धोटे, अमित झनक, संग्राम थोपटे (काँग्रेस) आशिष शेलार, नितेश राणे, अतुल भातखळकर, समीर कुणावर (भाजप) आणि नरेंद्र
भोंडेकर (अपक्ष) यांचा समितीत समावेश आहे.