Join us

पॅरावैद्यकीय परिषदेच्या अध्यक्षांच्या चौकशीसाठी समिती स्थापन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2019 5:58 AM

या समितीत वैद्यकीय शिक्षण संचालनालयातील एक वरिष्ठ अधिकारी व वैद्यकीय शिक्षण विभागातील एका अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे.

मुंबई : महाराष्ट्र पॅरावैद्यक परिषद मनमानी कारभार करीत असून, या परिषदेचे अध्यक्ष धनंजय कुलकर्णी यांच्यावर कारवाई करण्यात यावी, याविषयी लेखी तक्रार महाराष्ट्र असोसिएशन आॅफ प्रॅक्टिसिंग पॅथालॉजिस्ट अ‍ॅण्ड मायक्रोबायोलॉजिस्ट संघटनेचे अध्यक्ष डॉ. संदीप यादव यांनी केली आहे. वैद्यकीय शिक्षण संचालनालयाने या तक्रारीची दखल घेतली असून, पॅरावैद्यक परिषदेचे अध्यक्ष धनंजय कुलकर्णी यांच्या चौकशीसठी द्विसदस्यीय समितीची नेमणूक केली आहे. वैद्यकीय शिक्षणमंत्री डॉ. गिरीश महाजन यांनाही ही तक्रार करण्यात आली आहे.

या समितीत वैद्यकीय शिक्षण संचालनालयातील एक वरिष्ठ अधिकारी व वैद्यकीय शिक्षण विभागातील एका अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ. संदीप यादव यांनी केलेल्या तक्रारीनुसार, डीएमएलटी किंवा अर्हताधारक व्यक्तींना पॅथालॉजीस्टच्या वैध नियुक्तीशिवाय स्वतंत्रपणे प्रयोगशाळा चालवून पॅथालॉजिस्टनी प्रमाणित केल्याशिवाय चाचणी अहवाल देण्याची कोणतीही तरतूद महाराष्ट्र पॅरावैद्यक परिषदेच्या कायद्यामध्ये नाही. पॅरावैद्यक व्यवसायी व्यक्तींनी स्वतंत्र व्यवसाय करण्याची कोणतीही तरतूद या कायद्यात नाही, असे त्यांनी म्हटले आहे. तसेच वैद्यकीय परिषदेकडे नोंदणीकृत वैद्यक व्यवसायी असल्याखेरीज पॅथालॉजी तपासण्यांचे अहवाल प्रमाणित करणे हा अवैध व्यवसाय ठरतो, असा उल्लेख आहे.

याविषयी डॉ. यादव यांनी सांगितले की, कुलकर्णी हे स्वत: श्रीराम क्लिनिकल लॅबोरेटरी चालवितात. वैद्यकीय अहवालांवर डॉ. दिलीप वानकर या पॅथालॉजिस्टचे नाव नमूद करतात. हे अहवाल स्वत: प्रमाणित करून रुग्णांना वितरित करतात, हा अवैध व्यवसाय आहे. यामुळे महाराष्ट्र वैद्यकीय व्यवसायी अधिनियमाचे उल्लंघन आहे.