मंत्रिमंडळ बैठकीत झाली चर्चा
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी) परीक्षा उत्तीर्ण होऊनही नोकरी मिळत नसल्याने पुण्यातील स्वप्निल लोणकर या तरुणाच्या आत्महत्येचे तीव्र पडसाद राज्यात उमटत आहेत. रविवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतही यावर चर्चा झाली. आयोगाच्या परीक्षा आणि निवडीच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर जो विलंब होतो तो कसा टाळता येईल, याचा अभ्यास करण्यासाठी एक समिती गठीत करण्याचा निर्णय झाला. तर स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लोणकर यांच्या संदर्भात सविस्तर माहिती मंत्रिमडळाला दिल्याचे समजते.
स्वप्नील लोणकर या तरुणाने २०१९ मध्ये एमपीएससीची राज्य अभियांत्रिकी सेवा पूर्व- परीक्षा दिली होती. मुख्य परीक्षा २४ नोव्हेंबर २०१९ रोजी झाली. या परीक्षेचा निकाल २८ जुलै २०२० रोजी लागला. या परीक्षेत एकूण ३ हजार ६७१ उमेदवार पात्र ठरले होते. एकंदर १२०० पदांसाठी ही परीक्षा झाली होती. दरम्यान, एसईबीसी (सामाजिक व आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्ग) संदर्भात ९ सप्टेंबर २०२० रोजी सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम आदेशान्वये स्थगिती दिली होती. त्यामुळे संबंधित सर्व प्रक्रिया थांबवावी लागली. परिणामतः या परीक्षांमधील उत्तीर्णांच्या मुलाखती होऊ शकल्या नाहीत. एसईबीसी संदर्भातील अंतिम आदेश सर्वोच्च न्यायालयाने ५ मे २०२१ रोजी दिला आहे. मात्र या दरम्यान कोविड साथीच्या अनुषंगाने ब्रेक दि चेन अंतर्गत राज्य शासनाने निर्बंध लागू केलेले होते, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे समजते.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी एमपीएससीवर तातडीने सदस्य नेमण्याची मागणी केली. एमपीएससीच्या विद्यार्थ्याने केलेली आत्महत्या हा गंभीर प्रश्न आहे. आयोगावर सदस्यच नेमलेले नाहीत. परीक्षा होत नाहीत, सदस्यच नसल्याने मुलाखती होत नाहीत. परीक्षा उत्तीर्ण होऊनही दोन दोन वर्षे उमेदवारांची नियुक्तीच होत नाही. त्यामुळे तातडीने सदस्य नेमावेत आणि आयोगाच्या संपूर्ण प्रक्रियेचे मूल्यांकन करण्याची गरज फडणवीस यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली.