संसर्ग नियंत्रणाची जबाबदारी सामान्यांचीही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:08 AM2021-02-23T04:08:15+5:302021-02-23T04:08:15+5:30
संसर्ग नियंत्रणाची जबाबदारी सामान्यांचीही लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : राज्यासह मुंबईत नियंत्रणात आलेला कोरोनाचा संसर्ग पुन्हा डोके वर काढत ...
संसर्ग नियंत्रणाची जबाबदारी सामान्यांचीही
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्यासह मुंबईत नियंत्रणात आलेला कोरोनाचा संसर्ग पुन्हा डोके वर काढत आहे. अशा स्थितीत अनलाॅकचा पुढचा टप्पा सुरू झाल्याने सामान्य नागरिक घराबाहेर पडण्यास सुरुवात झाली आहे. एकीकडे रुग्णसंख्या वाढत असताना कोविड-१९चा संसर्ग टाळण्यासाठी स्वत:ची काळजी घेणे आणि संसर्गाला प्रतिबंध करणे याला प्राधान्य देणे गरजेचे आहे. आता अनेक सामाजिक व्यवहार सुरू झाले आहेत आणि सार्वजनिक जागा खुल्या झाल्या आहेत, पण अजूनही खबरदारी घेणे गरजेचे आहे. सध्याच्या परिस्थितीविषयी डॉ. संजय शाह यांच्याशी केलेले बातचीत...
नियंत्रणात आलेला कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढत आहे, याची कारणे काय?
तापमानातील बदल, रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांचा शोध घेण्यातील शिथिलता, मास्क वापरण्यास टाळाटाळ, सार्वजनिक समारंभातील गर्दी, अनलाॅकचा पुढचा टप्पा आणि कोरोनाविषयी गांभीर्याबद्दल अनभिज्ञता अशा विविध कारणांमुळे कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढताना दिसत आहे. त्यामुळे प्रत्येकाने स्वतःच्या आरोग्यासह इतरांच्या सुदृढ, निरोगी आरोग्याचा विचार करून मास्कचा वापर, स्वच्छता आणि शारीरिक अंतर राखणे ही त्रिसूत्री पाळणे गरजेचे आहे. संवेदनशील गटातील व्यक्तींनी अधिक खबरदारी घ्यावी.
रुग्णालयात जाताना कोणती काळजी घ्यावी?
रुग्णालयात शक्यतो एकट्यानेच जा किंवा फार तर एखाद्या व्यक्तीला सोबत न्या. कुटुंबातील एखादी व्यक्ती रुग्णालयात दाखल असेल तर तिला भेटायला गर्दी करू नका. रुग्णालयात इतर व्यक्तींपासून सहा फुटांचे अंतर राखा. सर्वकाळ मास्क घालून राहा आणि दारांना किंवा लिफ्टच्या बटणांना वगैरे हात लावल्यानंतर हात स्वच्छ करण्यासाठी सॅनिटायझर वापरा. डॉक्टरांच्या कक्षात प्रवेश करण्यापूर्वी थर्मल चेक करून घ्या. डॉक्टरांना सर्व लक्षणे, याआधी केलेल्या प्रवासांचे, औषधांचे तपशील इत्यादी गोष्टी विनासंकोच सांगा. रुग्णालयातील पृष्ठभागांना विनाकारण स्पर्श करू नका किंवा त्यांच्यावर टेकून राहू नका. तसे केल्यास ताबडतोब हात धुवा किंवा सॅनिटायझर वापरा. १८ वर्षांखालील मुलांना, अत्यंत गरजेचे असल्याशिवाय रुग्णालयात नेऊ नका. तिथे जाण्याआधी डॉक्टरांना फोनवरून लक्षणे सांगा आणि मुलाला रुग्णालयात आणण्याची गरज आहे किंवा नाही याचा निर्णय डॉक्टरांना घेऊ द्या. रुग्णालयाला भेट दिल्यानंतर सर्व मेडिकल फाइल्स, औषधे किमान ४८ तासांसाठी बाजूला ठेवा. वापरापूर्वी सर्व गोष्टी सॅनिटाइझ करा.
कार्यालयात काम करताना काेणती काळजी घ्यावी?
कर्मचारी विशिष्ट संख्येनेच उपस्थित असतील याची काळजी घ्यावी. कार्यालयात असताना सोशल डिस्टन्सिंगचे योग्य प्रकारे पालन करा. कार्यालयात सहज जाता येण्याजोगी सॅनिटायझेशन स्टेशन्स असायला हवीत. दाराचे नॉब्ज, हॅण्डल्स, रेलिंग्ज, खुर्चीचे हात, टेबल्स, लाइटची बटणे, टेलिफोन्स, कीबोर्ड्स, लिफ्टची बटने, टॉयलेटचे पृष्ठभाग अशा सर्व गोष्टी दर काही तासांनी पुसून स्वच्छ करायला हव्यात. कार्यालयात प्रत्येक व्यक्तीने मास्क घातलेला असावा याची खबरदारी घ्या. कार्यालयात प्रवेश करण्यापूर्वी प्रत्येक व्यक्तीच्या शरीराचे तापमान नॉन-कॉन्टॅक्ट इन्फ्रा-रेड थर्मोमीटरच्या साहाय्याने तपासायला हवे.
प्रवासादरम्यान संसर्गाचा धोका लक्षात घेऊन कोणती खबरदारी घ्यावी?
सार्वजनिक वाहतूक सेवेचा वापर करताना संपूर्ण वेळ चेहऱ्याचा मास्क आणि फेस शिल्ड घालून ठेवा आणि इतरांपासून शक्य तितके जास्त अंतर राखा. स्टिअरिंग व्हील, हॅण्डल बार, दाराची हॅण्डल्स, गिअर शिफ्ट लिव्हर, बटणे/टच स्क्रीन्स, वायपर/टर्न सिग्नल स्टॉक्स, आर्मरेस्ट, ग्रॅब हॅण्डल्स वापरल्यावर, सीट पुढेमागे केल्यावर प्रत्येक वेळी सॅनिटायझर वापरा. रेडिओ कॅबने प्रवास करताना खिडक्या उघड्या ठेवा. ताजी हवा गाडीत खेळती राहू द्या. प्रवास करण्यासाठी गर्दीची वेळ टाळा. पैसे वापरण्याऐवजी ऑनलाइन पेमेंट करा किंवा ट्रॅव्हल कार्ड्स वापरा. घरी परतल्यावर घरातील कोणत्याही पृष्ठभागाला हात लावण्यापूर्वी किंवा घरातील कोणतीही कामे करण्यापूर्वी स्वत:ला न विसरता सॅनिटाइझ आणि स्वच्छ करायला हवेत.
- डॉ. संजय शाह, जनरल फिजिशियन
.....................