मराठवाडा मुक्तीसंग्रामातील संघर्षाची माहिती सर्वांपर्यंत पोहोचवा; सुधीर मुनगंटीवार यांचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2023 12:00 PM2023-08-29T12:00:18+5:302023-08-29T12:01:08+5:30

मंत्रीमंडळ बैठक छत्रपती संभाजीनगर येथे आयोजण्याचा प्रस्ताव

Communicate information about the Marathwada liberation struggle to all; Appeal by Minister Sudhir Mungantiwar | मराठवाडा मुक्तीसंग्रामातील संघर्षाची माहिती सर्वांपर्यंत पोहोचवा; सुधीर मुनगंटीवार यांचे आवाहन

मराठवाडा मुक्तीसंग्रामातील संघर्षाची माहिती सर्वांपर्यंत पोहोचवा; सुधीर मुनगंटीवार यांचे आवाहन

googlenewsNext

मुंबई: मराठवाडा मुक्तीसंग्रामाच्या संघर्षाची माहिती नवीन पिढीसह देशभरातील नागरिकांना होणे आवश्यक आहे. मुक्तीसंग्रामाचे हे अमृत महोत्सवी वर्ष असल्याने यानिमित्त मराठवाड्याच्या प्रत्येक जिल्ह्यात दर्जेदार कार्यक्रमांचे आयोजन करून मुक्तीसंग्रामाची माहिती सर्वांपर्यंत पोहोचवा, असे निर्देश सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले. मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासासाठी मुक्तीसंग्राम अमृतमहोत्सवानिमित्त मंत्रिमंडळाची बैठक घेण्याबाबत मुख्यमंत्री यांना विनंती करण्यात आली असल्याची माहिती त्यांनी दिली.

मराठवाडा मुक्तीसंग्रामाच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित करावयाच्या कार्यक्रमांचा मंत्री मुनगंटीवार यांनी आज आढावा घेतला.  मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृत महोत्सवानिमित्त 15 ते 17 सप्टेंबर 2023 रोजी मराठवाड्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. यामध्ये मराठवाडा मुक्तीसंग्राम केंद्रभागी ठेवून विविध स्पर्धा, दर्जेदार सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन तसेच माहितीपट तयार करण्याचे निर्देश मंत्री मुनगंटीवार यांनी दिले. ते म्हणाले, औरंगाबाद ही मराठवाड्याची राजधानी असल्याने शहरामध्ये शासकीय इमारती, तसेच रस्त्यांवरील खांबांवर रोषणाई करण्यात यावी तसेच चौकांचे सुशोभिकरण, भिंतींवर सयुक्तिक चित्रे, रंगरंगोटी करण्यात यावी. मराठवाड्यातील आठही जिल्ह्यातील हुतात्मा स्मारकांवरही रोषणाई करण्यात यावी. 

मराठवाडा मुक्तीसंग्रामाशी संबंधित कार्यक्रमांमध्ये सर्वांना सहभागी होता यावे यासाठी 26 जानेवारी पर्यंत मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्याचे निर्देश मुनगंटीवार यांनी दिले. यामध्ये प्रभातफेरी, व्याख्याने, विविध गटांच्या मॅरेथॉन स्पर्धा, लोककला, भारूड, पोवाडे आदी सांस्कृतिक कार्यक्रम, गीत गायन, चित्रकला, निबंध आदी स्पर्धा, महानाट्य स्पर्धा, विद्यार्थ्यांच्या कलागुणदर्शनाचे कार्यक्रम, नवरात्रौत्सवात महिलांसाठी स्पर्धा, प्रबोधनकार/ कीर्तनकार यांची परिषद, चित्ररथ, रॅली आदींचे आयोजन करण्याची सूचना त्यांनी केली. सर्व कार्यक्रमांची मध्यवर्ती कल्पना ही मुक्तीसंग्राम ही असावी तसेच कार्यक्रमांमध्ये सुसूत्रता आणि समन्वय असावा, असे निर्देशही त्यांनी दिले. विविध माध्यमांचा कल्पकतेने वापर करून कार्यक्रमांची माहिती अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात यावी, असे त्यांनी सांगितले. मराठवाड्यातील पर्यटन वाढण्याच्या दृष्टीने देशभरातील नागरिकांना आवाहन करण्यात यावे, अशी सूचनाही त्यांनी केली.

अमृत महोत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागामार्फत माहितीपट तयार करण्यात येणार असून कॉफी टेबल बुक देखील तयार करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे मराठवाडा मुक्तीसंग्राम स्मारक उभारण्याचे नियोजन आहे. याबाबतचा आढावा घेऊन मंत्री श्री.मुनगंटीवार यांनी त्याबाबत उपयुक्त सूचना केल्या. या स्मारकामधे मराठवाडा मुक्तिसंग्रामाविषयी प्रदर्शनी, आर्ट गॅलरी, प्रेक्षागृह, नाट्यमंच, ग्रंथालय, उपाहारगृह, आदि सुविधा योग्य प्रमाणात असाव्यात. त्याकरता देशभरातील उत्तमोत्तम संग्रहालये आणि स्मारके यांची पाहाणी संबंधित समितीने करावी अशी सुचनाही मुनगंटीवार यांनी यावेळी केली. हे स्मारक मराठवाडा मुक्ति संग्रामाची खरी गाथा लोकांसमोर मांडणारे झाले पाहिजे असेही मुनगंटीवार म्हणाले.

Web Title: Communicate information about the Marathwada liberation struggle to all; Appeal by Minister Sudhir Mungantiwar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.