पंतप्रधान नरेंद्र मोदींनी साधला भाजपा आमदारांशी संवाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2018 05:15 AM2018-04-12T05:15:28+5:302018-04-12T05:15:28+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज महाराष्ट्रासह देशातील भाजपाच्या काही आमदार-खासदारांशी दूरध्वनीवरून संपर्क साधला. सकाळी ११ च्या सुमारास तुम्हाला पंतप्रधानांचा कॉल येऊ शकतो, अशा सूचना आमदार, खासदारांना कालच देण्यात आला होता.
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज महाराष्ट्रासह देशातील भाजपाच्या काही आमदार-खासदारांशी दूरध्वनीवरून संपर्क साधला. सकाळी ११ च्या सुमारास तुम्हाला पंतप्रधानांचा कॉल येऊ शकतो, अशा सूचना आमदार, खासदारांना कालच देण्यात आला होता. त्यामुळे सगळे सकाळपासूनच अलर्ट होते.
कॉन्फरन्सिंगद्वारे मोदींनी कॉल केला आणि सुरुवातीला ते स्वत: बोलले. मी तंत्रज्ञानाचा वापर करून आपल्या सगळयांशी संवाद साधत आहे आपणही आपल्या मतदारसंघातील विविध संघटना, व्यक्ती यांच्याशी एकाचवेळी असा संवाद साधावा, असे आवाहन त्यांनी केले. भाजपाच्या वतीने महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीपासून (१४ एप्रिल) ते ५ मे पर्यंत ग्राम संवाद अभियान सुरू होत आहे. त्यावेळी गावागावात जाऊन सामान्यांच्या समस्या जाणून घ्या, त्यांना केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध लोककल्याणकारी योजनांची माहिती द्या, संवाद वाढवा, असे निर्देश मोदी यांनी दिले. काही आमदार, खासदारांची मते त्यांनी जाणून घेतली.