लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या मध्यवर्ती समितीचे सदस्य, ज्येष्ठ नेते महेंद्र सिंह यांचे रविवारी सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते ७७ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी आणि बंधू असा परिवार आहे. त्यांच्यावर मालाड येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी डावी चळवळ आणि कामगार संघटनांचे नेते, कार्यकर्ते उपस्थित होते.
महेंद्र सिंह यांना अलीकडेच कोविडची बाधा झाली होती. मात्र, त्यातून ते पूर्णपणे बरे झाले होते. महेंद्र सिंह यांचा जन्म १ ऑक्टोबर १९४३ रोजी झाला. ते इंजिनिअर होते आणि काही काळ डोंबिवलीतील कारखान्यात त्यांनी नोकरी केली; पण स्वतःच्याच कारखान्यात त्यांनी कामगारांची युनियन स्थापन केल्यामुळे मालकांनी त्यांची कोलकात्याला बदली केली. तेथे माकपशी त्यांचा निकटचा संपर्क झाला. त्यानंतर नोकरी सोडून मुंबईत येऊन १९७१ साली ते पक्षाचे पूर्णवेळ कार्यकर्ते बनले. त्यांच्या पक्षातील जीवनाला यंदा ५० वर्षे पूर्ण झाली. पक्षात आल्यानंतर त्यांनी आधी डेमोक्रॅटिक यूथ फेडरेशन ही युवा संघटना स्थापन केली. तसेच १९७० साली सिटूच्या झेंड्याखाली त्यांनी ट्रेड युनियनचे काम सुरू केले. महेंद्र सिंह यांची १९८७ साली पक्षाच्या महाराष्ट्र राज्य कमिटीवर, १९९१ साली नाशिकच्या संघटना प्लिनममध्ये पक्षाच्या राज्य सचिव मंडळावर आणि २०१५ साली विशाखापट्टनमच्या राष्ट्रीय अधिवेशनात पक्षाच्या केंद्रीय कमिटीवर निवड झाली. मुंबई-महाराष्ट्रातील डाव्या आणि प्रागतिक पक्षांच्या आणि संघटनांच्या नेत्यांशी कॉ. महेंद्र सिंह यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. अनेक संयुक्त आंदोलनांत त्यांचे नेतृत्व असायचे. अलीकडेच २६ जूनच्या ‘शेती वाचवा, लोकशाही वाचवा’ दिनी मुंबईच्या ऑगस्ट क्रांती मैदानात झालेल्या संयुक्त निदर्शनात आणि राज्यपालांना भेटण्यास गेलेल्या प्रतिनिधी मंडळात त्यांचा सहभाग होता.