ठाण्यात उभारणार कम्युनिटी कॉलेज
By admin | Published: July 16, 2014 01:28 AM2014-07-16T01:28:05+5:302014-07-16T01:28:05+5:30
राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाने ठाणे जिल्ह्यातील कळवा येथील ७ एकर जमीन मुंबई विद्यापीठाला उपलब्ध करून दिली आहे.
मुंबई : राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाने ठाणे जिल्ह्यातील कळवा येथील ७ एकर जमीन मुंबई विद्यापीठाला उपलब्ध करून दिली आहे. या जागेवर मुंबई विद्यापीठ लवकरच कम्युनिटी महाविद्यालय उभारणार आहे. महाविद्यालयात दोन वर्षे मुदतीचे हॉस्पिटॅलिटीसारखे नावीन्यपूर्ण अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहेत.
राज्य शासनाने कळवा येथे उच्च व तंत्रशिक्षण विभागासाठी सात एकर जमीन राखीव ठेवली होती. ही जमीन कम्युनिटी महाविद्यालयासाठी उपलब्ध करून देण्याची विनंती विद्यापीठाने उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडे केली होती.
विद्यापीठाच्या विनंतीवरून सात एकर जमीन कम्युनिटी महाविद्यालयासाठी देण्यात आल्याची घोषणा उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे मंत्री राजेश टोपे यांनी मुंबई विद्यापीठाच्या दीक्षान्त सभागृहात मंगळवारी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत केली. उच्च व तंत्रशिक्षण विभागाची जमीन ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी मुंबई विद्यापीठाला देण्यास मान्यता दिली आहे. इतर प्रशासनांकडून जमीन हस्तांतरणाची प्रक्रिया येत्या १० दिवसांत पूर्ण होईल, असे टोपे यांनी सांगितले. कम्युनिटी महाविद्यालयातून २ वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना देशासह यूएसमध्ये नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे. मुंबई विद्यापीठाने हवाई विद्यापीठाशी शैक्षणिक करार केला असल्याने या महाविद्यालयात हॉस्पिटॅलिटीसारखे अभ्यासक्रम सुरू करण्याचा विद्यापीठाचा मानस असल्याचे टोपे म्हणाले. (प्रतिनिधी)
राज्य शासनाने ठाणे जिल्ह्यात १९६०नंतर विद्यापीठाला जमीन दिली आहे. कळव्यामध्ये कम्युनिटी महाविद्यालय सुरू होणार असून, याचा ठाण्यासह मुंबईतील विद्यार्थ्यांना लाभ होईल, असे वैद्यकीय शिक्षणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले.
कम्युनिटी महाविद्यालयात प्रत्येक शाखेसाठी ४0 किंवा ६0 जागा उपलब्ध असतील. जमीन ताब्यात आल्यानंतर इमारतीचे बांधकाम तातडीने सुरू करण्यात येईल, असे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राजन वेळूकर यांनी सांगितले.