आरोग्य विभागाचे डॉ. प्रदीप आवटे यांची माहिती
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : सध्या राज्यातील सर्व भागांत काेरोनाची दुसरी लाट सुरू आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे रुग्णालय व्यवस्थेवर ताण येणे स्वाभाविक आहे. काेराेना रुग्णांवर नजर टाकल्यास एक गोष्ट स्पष्टपणे लक्षात येते आणि ती म्हणजे या आजाराचे ७० टक्क्यांहूनही अधिक रुग्ण लक्षणे नसलेले किंवा सौम्य लक्षणे असणारे आहेत. त्यामुळे काेरोनाचा मुकाबला समर्थपणे करता यावा, यासाठी आपल्यापैकी प्रत्येकाने जबाबदारी घेतली तरी यासाठी शहरी भागात कम्युनिटी पँडेमिक प्लान (समुदायात पसरत जाणाऱ्या महामारीविराेधातील आराखडा) तयार करून त्याचे काटेकोर पालन करावे लागेल.
* काय करावे लागेल ?
- आपल्याकडे सर्वाधिक कोविड रुग्ण हे शहरी भागात आहेत. शहरी भागातही आपल्याला फिल्ड पातळीवर काही तयारी करावी लागेल तरच खूप मोठ्या प्रमाणावर असणारे सौम्य रुग्ण आपल्याला फिल्ड पातळीवर, घरगुती पातळीवर बरे करता येतील आणि रुग्णालयाकडे वळणारा अनावश्यक लोंढा थोपवता येईल. ज्यांना खरोखरच बेडची आवश्यकता आहे त्यांना बेड मिळेल आणि मृत्यूचे प्रमाणही अजून कमी करता येईल.
- प्रत्येक शहरी भागात प्रत्येक २५ हजार लोकसंख्येला एक याप्रमाणे आपल्याला एक कोविड क्लिनिक उभे करावे लागेल. सध्या राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या पाहता दर दशलक्ष लोकसंख्येमध्ये ५५० रुग्ण आहेत. याचा अर्थ आपण जेव्हा दर लाख लोकसंख्येमध्ये चार कोविड क्लिनिक उभी करू तेव्हा या प्रत्येक क्लिनिकला घरगुती विलगीकरणात असलेले सुमारे १०० रुग्ण पाहण्याची जबाबदारी असेल.
* शहरी भागातील फिल्ड टीम आणि कोविड क्लिनिक
प्रत्येक फिल्ड टीममध्ये असणारे सदस्य, साहित्य आणि त्यांचे काम याची ढोबळ रूपरेषा.
फिल्ड सदस्य - किमान एक मेडिकल डॉक्टर, एक नर्स, आरोग्य कर्मचारी, ५ ते १० स्वयंसेवक
साहित्य - पेशंट तपासणी साहित्य – पल्सॉक्सीमिटर/थर्मामीटर, सौम्य कोविड रुग्णांना लागणारी औषधे, ऑक़्सिजन कॉन्सेंट्रेटर, साधे ऑक्सिजन सिलिंडर, अपवादात्मक परिस्थितीत लागल्या तर काही अँटिजेन टेस्ट किट
फील्ड टीमच्या कामाचे स्वरूप - भागातील घरगुती विलग रुग्णांचे टेलिफोनिक मॉनिटरिंग व उपचार, पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध, गंभीरतेकडे झुकलेल्या रुग्णांना वेळेत हॉस्पिटलला पाठवणे, ज्या घरगुती विलग रुग्णांना बेड मिळण्याकरिता अडचण येत आहे त्यांना बेड मिळेपर्यंत ऑक्सिजन सेवा.
* मनुष्यबळ आणि इतर बाबींचे व्यवस्थापन
फिल्ड टीम एका क्लिनिकमध्ये बसेल. त्याला कोविड ऑक्सिजन क्लिनिक असे नाव असेल. या क्लिनिकचा पत्ता आणि लँडलाईन नंबर तसेच इतर काही मोबाइल नंबर त्या वॉर्डातील सर्व व्यक्तींना माहिती होतील यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे.
✓ कोविड ऑक्सिजन क्लिनिक - हे कोणत्याही खासगी क्लिनिकमध्ये किंवा त्या भागातील मोठ्या सोसायटीच्या क्लब हाऊसमध्ये स्थापन करता येईल.
✓ मेडिकल ऑफिसर - संबंधित परिसरातील खासगी डॉक्टर्स, निमा आणि आयएमए सदस्य यांना या क्लिनिकची जबाबदारी देण्यात यावी.
✓ वेळ - २४ बाय ७ सुरू असावे.
✓ रुग्णांचे वर्गीकरण - हे क्लिनिक त्यांच्या भागातील सर्व घरगुती विलग रुग्णांच्या किमान आवश्यक तपासण्या करून त्यानुसार कोणत्या रुग्णाला भरती करणे आवश्यक आहे आणि कोणत्या रुग्णावर घरगुती पातळीवर उपचार करणे शक्य आहे, याचा निर्णय घेऊ शकतील. यासाठी विशिष्ट प्रयोगशाळांशी समन्वय साधता येईल.
✓ सध्या अनेक महाविद्यालयीन मुले, शिक्षक, निवृत्त लोक लॉकडाऊनमुळे घरी बसून आहेत. यातील इच्छुकांना स्वयंसेवक म्हणून घेता येईल.
✓ ऑक्सिजन सुविधा - या क्लिनिकमध्ये ऑक्सिजन कॉन्सेेंट्रेटर किंवा साधे ऑक्सिजन सिलिंडर असणे आवश्यक आहे. त्यामुळे ज्या घरगुती विलग व्यक्तींना ऑक्सिजन लागेल त्यांची बेड मिळेपर्यंत येथे सोय होऊ शकेल.
✓ प्रत्येक निवडणूक वॉर्ड स्तरावर असे क्लिनिक उपलब्ध झाल्याने प्रत्येक २५ ते ३० हजार लोकसंख्येमागे अशी सुविधा निर्माण झाल्याने घरगुती विलग झालेल्या रुग्णांची मोठ्या प्रमाणावर सोय होईल.
✓ सोसायटी क्लिनिक - शहरातील मोठ्या सोसायटींमध्ये तेथील क्लब हाऊसला त्या सोसायटीमध्ये राहणाऱ्या डॉक्टरांच्या मदतीनेही अशी आणखी क्लिनिक सुरू करता येतील.
✓ मोकळ्या फ्लॅटमध्ये विलगीकरण - अनेक सोसायट्यांमध्ये काही फ्लॅट मोकळे असतात. येथे ज्या काेराेनाबाधित रुग्णांच्या घरी पुरेशी जागा नाही त्यांना ठेवता येईल.
✓ किमान २ ते ४ बेड असणारे छाेटे रुग्णालय / क्लिनिकमध्येही अशी सुविधा निर्माण करून त्याची जनतेला माहिती देता येईल.
✓ या व्यवस्थापनासाठी स्थानिक स्तरावरील प्रतिष्ठित लोक, पोलीस अधिकारी, व्यापारी, रोटरी / लायन्स क्लब, डॉक्टरांच्या विविध संस्था यांना सहभागी करून घेता येईल.
आपण या प्रकारे सर्व शहरी भागात, नगरपालिका क्षेत्रात अशी व्यवस्था निर्माण करू शकतो. या व्यवस्थापनामुळे सध्या रुग्णालयांवर आलेला ताण कमी होऊ शकतो.
स्वयंसेवी व्यक्तींना प्रोत्साहन
कोविडसाठी जी रुग्णालये राज्यभर काम करत आहेत तेथील मनुष्यबळ मागील वर्षभरात अतिकामाने, मानसिक ताणाने दमले आहेत. त्यामुळे ज्या ज्या ठिकाणी डॉक्टर्स, नर्सेस, इतर मनुष्यबळ हे खासगी क्षेत्रातून / स्वयंसेवी पद्धतीने पुढे येण्यासाठी तयार आहे, त्यांना प्रोत्साहन दिले पाहिजे. विशेषतः शासकीय आरोग्य संस्थांमध्ये मनुष्यबळाची कमतरता असल्याने अशा पद्धतीने जे स्वयंसेवक पुढे येत आहेत त्यांना आपल्या आरोग्य संस्थेमध्ये काम करू देण्याबाबतची परवानगी संस्थास्तरावर तेथील प्रमुखाला देता आली पाहिजे. यामुळे मनुष्यबळावरील ताण कमी होण्यास मदत होईल.
कम्युनिटी मॉडेल अवलंबिणे शक्य
कल्पक आणि समाजाभिमुख पद्धतीने विचार करून कोविड नियंत्रणाचे सर्वांगीण असे कम्युनिटी मॉडेल आपल्याला तयार करणे शक्य होणार आहे. अनेक ठिकाणी ते होताना दिसतही आहे. फक्त ते सर्वव्यापक होण्याची गरज आहे. सर्वांनी एकत्र येऊन स्थानिक पातळीवरील संसाधनांचा, गरजेचा आणि मर्यादांचा विचार करून असे मॉडेल प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक शहरात आपल्यालाच उभे करावे लागेल. कोविडच्या या प्रचंड मोठ्या संकटाला आपण एकत्र येऊनच परतवू शकतो.
- डॉ. प्रदीप आवटे,
साथरोग सर्वेक्षण अधिकारी, सार्वजनिक आरोग्य विभाग
............................