बंद लोकल सेवेमुळे मुंबईकरांना 'बेस्ट' आधार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2021 09:05 AM2021-08-08T09:05:12+5:302021-08-08T09:05:44+5:30
बेस्ट उपक्रमाच्या तिजोरीत दीड वर्षानंतर आता दररोज सरासरी दोन कोटी रुपये उत्पन्न जमा होऊ लागले आहे.
- शेफाली परब-पंडित
मुंबई : कोरोनाचा प्रसार मुंबईत पूर्णपणे आटोक्यात आला तरी अद्याप सर्वसामान्यांना लोकल प्रवासाची परवानगी मिळालेली नाही. अशावेळी स्वस्त आणि सुरक्षित ' बेस्ट ' प्रवासालाच मुंबईकरांनी प्राधान्य दिले आहे लॉकडाऊन काळात अडीच लाखांवर पोहोचलेली बेस्ट प्रवाशांची दररोजची संख्या आता २३ लाखांहून अधिक आहे. त्यामुळे बेस्ट उपक्रमाच्या तिजोरीत दीड वर्षानंतर आता दररोज सरासरी दोन कोटी रुपये उत्पन्न जमा होऊ लागले आहे.
मुंबईची दुसरी जीवनवाहिनी असलेल्या बेस्ट उपक्रमाच्या प्रवासी संख्येत मागील दशकभरात चढउतार राहिला आहे. सन २००९ मध्ये दररोज ४४ लाख प्रवासी बेस्ट बसगाड्यांमधून प्रवास करीत होते. कालांतराने शेअर रिक्षा, टॅक्सी, मेट्रो सेवा यांच्या वाढत्या स्पर्धेचा मोठा फटका बेस्ट उपक्रमाला बसला. यामुळे प्रवासी संख्या कमी होऊन १७ लाखांपर्यंत घसरली होती. यामध्ये दिवसेंदिवस घट होत गेल्याने बेस्ट उपक्रमाच्या आर्थिक अडचणीत वाढ झाली.
दरम्यान, २०१९ मध्ये महापालिका प्रशासनाने आखून दिलेल्या कृती आराखड्यानुसार बेस्ट उपक्रमाच्या बसभाड्यात जुलै महिन्यापासून मोठी कपात करण्यात आली. किमान भाडे पाच ते कमाल २० रुपये एवढे असल्याने दररोजची प्रवासी संख्या ३४ लाखांवर पोहोचली होती. मात्र परिस्थितीत सुधारणा होत असल्याचे वाटत असताना मार्च २०२० पासून मुंबईत कोरोनाचा शिरकाव झाला. २३ मार्च २०२० पासून लॉकडाऊन करण्यात आल्याने अत्यावश्यक सेवेतील कर्मचारीच तेवढे बेस्ट बसमधून प्रवास करीत होते.
बेस्टच्या ताफ्यात सुधारणा
लॉकडाऊन शिथिल करण्यात आले तरी मुंबईत अद्यापही लोकलमधून प्रवास करण्याची सर्वसामान्य प्रवाशांना परवानगी देण्यात आलेली नाही. त्यामुळे बेस्ट बसगाड्यांमध्ये पुन्हा एकदा प्रवाशांची गर्दी उसळू लागली आहे. हीच संधी साधून बेस्ट उपक्रमानेही वातानुकूलित, मिनी - मिडी, इलेक्ट्रिक बसगाड्यांचा ताफा वाढवला आहे. यामुळे रिक्षा - टॅक्सीने प्रवास करणारे प्रवाशी बेस्टकडे वळले आहेत.
अशी वाढत गेली प्रवासी संख्या
तारीख प्रवासी उत्पन्न बसगाड्या
जुलै
२६ २३ लाख १४ हजार १,९१,७८,००० ३१६१
२७ २२ लाख ८२ हजार १,८५,४८,००० ३१६५
२८ २२ लाख ८० हजार १,८२,७९,००० ३१६०
२९ २२ लाख ९८ हजार १,८५,६९,००० ३१६८
३० २३ लाख आठ हजार १,८५,३८,००० ३१६९
ऑगस्ट
२ २३ लाख ६३ हजार २,००,२६,००० ३१६२
३ २३ लाख ३६ हजार १,९३,७५,००० ३१६३