लोकल सुरू करण्याच्या निर्णयाचे स्वागत; काही प्रवाशांच्या मनात अद्यापही संभ्रम
By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2021 10:13 AM2021-08-10T10:13:51+5:302021-08-10T10:14:14+5:30
अटी शिथील करण्याची मागणी
मुंबई : लसीचे दोन डोस घेऊन १४ दिवस पूर्ण झालेल्या नागरिकांना सरकारने १५ ऑगस्ट पासून लोकल प्रवासाची परवानगी दिली आहे. या निर्णयाचे अनेक प्रवाशांनी स्वागत केले असले तरीदेखील अद्यापही काहींच्या मनात संभ्रम व प्रश्न कायम असल्याचे दिसून येत आहे. लोकल प्रवासावर घातलेल्या अटी योग्यच आहेत असे मत काही प्रवाशांचे आहे. तर या अटींमुळे अनेक नागरिकांना लोकल प्रवास करता येणार नाही त्यामुळे लोकल प्रवासासाठी अटींचे बंधन नको असे काही प्रवासी म्हणत आहेत.
लसीच्या पहिल्या डोसनंतर कोरोना झालेल्यांना दुसरा डोस घेण्यासाठी लांबलचक प्रतीक्षा करावी लागत आहे. त्यामुळे त्यांना पुढील तीन ते चार महिने लोकल प्रवास करता येणार नाही. तसेच लसीकरणाची गती पाहता अनेकांना दुसरा डोस घेण्यासाठी अडचण येत आहे. त्यामुळे सरकारने घातलेल्या अटींमध्ये काही प्रमाणात दिलासा मिळणे गरजेचे आहे.
- विश्वास चौगुले
सरकारच्या या निर्णयामुळे घरातील कर्त्या व्यक्तीला उपजिविकेसाठी लोकलचा आधार मिळणार आहे. परंतु त्या व्यक्तींकडे मोबाईल नाही अशा व्यक्तींना रेल्वेच्या पासकरीता पालिकेच्या कार्यालयात खेपा घालाव्या लागणार आहेत. हा त्रास वाचवण्यासाठी सरकारने काहीतरी सोपा मार्ग काढावा.
- माधवी ओव्हाळ
मुख्यमंत्र्यांनी लोकल प्रवासाच्या केलेल्या घोषणेचे स्वागत. परंतु लसींचा अनियंत्रीत पुरवठा पहाता बर्याच जणांना पहीला व दुसरा डोस मिळण्यास विलंब होऊ शकतो. अनेकांना दुसरा डोस घेतला नाही म्हणुन लोकल प्रवास करता येणार नाही. त्यामुळे रोजगारा निमित्त घराबाहेर पडणाऱ्या व्यक्तींना प्राधान्याने लसीचे द्यावी.
- सुभाष तळेकर, अध्यक्ष,
मुंबई डबेवाला असोशिएशन
सरकारने घेतलेला निर्णय अत्यंत योग्य आहे. दोन डोस घेतल्याने कोरोनाचा संसर्ग कमी होण्यास मदत होईल. परंतु सरकारने प्रवासासाठी व्यवस्थित नियोजन करायला हवे. जेणेकरून लोकल पुन्हा बंद करण्याची वेळ यापुढे कधीच येणार नाही. - सुनिता मोझे
पहिला लॉकडाउन शिथील केल्यानंतर लोकलच्या प्रवासाला ७ ते १२ व ४ ते ९ अशी वेळेची मर्यादा घालण्यात आली होती. आताही अशीच मर्यादा घालून लोकल सुरू करायला हवी त्याने मुंबईकरांना खरा दिलासा मिळेल. - धनंजय शिंदे