संकुचितपणा आत्मघातकी
By admin | Published: January 4, 2015 12:13 AM2015-01-04T00:13:44+5:302015-01-04T00:13:44+5:30
मराठी समाज हा साऱ्या भारताचा विचार करत आलेला आहे. सर्व धर्मांचा आदरयुक्त सहभाग असलेला अखंड हिंदुस्थान ही संकल्पना मराठी माणसांनीच मांडली.
मुंबई : मराठी समाज हा साऱ्या भारताचा विचार करत आलेला आहे. सर्व धर्मांचा आदरयुक्त सहभाग असलेला अखंड हिंदुस्थान ही संकल्पना मराठी माणसांनीच मांडली. पानिपतसारखी लढाई दिल्लीत सत्तेवर असलेल्या मुसलमान बादशहाच्या राज्याच्या संरक्षणासाठी लढून किंमत चुकवलेली आहे, आज देशाला मराठ्यांनी हे अभिमानाने सांगितले पाहिजे. मात्र मराठ्यांचे हे योगदान विसरून त्यांना वडापावपर्यंतच संकुचित करणे आत्मघातकी ठरेल, अशी खंत ८८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांनी व्यक्त केली.
शब्दगप्पांच्या मुलाखतीत मोरे यांनी आजवरचे इतिहास लेखन, त्यामागील प्रेरणा, त्यातील वाटा आणि वळणे, राज्याच्या इतिहास लेखनातील पेच, मराठी समाजापुढील आव्हाने आणि आगामी संमेलनाबाबत प्रवास विशद केला.
‘मराठा’कार आचार्य अत्रे, ‘प्रभात’कार वा.रा. कोठारी या संपादक लेखकांचा माझ्या जीवनावर प्रभाव असून, बाबासाहेब आजरेकर या वारकरी परंपरेतील कीर्तनकाराचा लेखन शैलीवर परिणाम झाल्याचे डॉ. मोरे यांनी सांगितले. यशवंतराव चव्हाणांवर बृहदचरित्र
लिहिण्याचा संकल्पही या वेळी त्यांनी व्यक्त केला.
महाराष्ट्राचा इतिहास हा जातीजातींचा इतिहास आहे, असे दिसते. याची सुरुवात इतिहासाचार्य वि.का. राजवाडे यांनी केली. त्यानंतर मराठा, नवबौद्ध, ओबीसी असे सारे घटक जागे झाले आणि आपापल्या जातीची टिमकी वाजवून इतिहास लेखन करू लागले. त्यातून मराठ्यांचा समग्र वास्तव इतिहास पुढे येत नाही अशी अडचण झाल्याचे दु:ख मोरे यांनी व्यक्त केले. (प्रतिनिधी)
पंजाब-महाराष्ट्र संबंध उलगडणार!
घुमान साहित्य संमेलनात मराठी माणसाला आपण कोण होतो? भारत या राष्ट्रासाठी आपण काय केले? पंजाब- महाराष्ट्र संबंध का आहे? मराठी माणूस सगळ्या भारताचा विचार करतो. पंजाब घडवण्यात म्हणूनच संत नामदेवांनी वारकरी संप्रदायाची तत्त्व सांगून काय योगदान दिले आहे, या प्रश्नांची चर्चा करणार असल्याचेही सूतोवाच या वेळी डॉ. मोरे यांनी केले.