कंपनीत अनधिकृत शेडमध्ये हजारो कामगारांचे वास्तव्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:08 AM2021-03-13T04:08:36+5:302021-03-13T04:08:36+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : मुंबईत कोरोनाचे रुग्ण पुन्हा एकदा वाढू लागल्याने प्रशासनाच्या वतीने मास्क परिधान करणे व सोशल ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबईत कोरोनाचे रुग्ण पुन्हा एकदा वाढू लागल्याने प्रशासनाच्या वतीने मास्क परिधान करणे व सोशल डिस्टन्सिंग पाळण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे. मात्र चेंबूरच्या गडकरी खाण येथील प्रकाश नगर मध्ये असणाऱ्या एका मेटल बॉक्स कंपनीच्या आवारात अनधिकृतपणे सुमारे दीड हजार कामगार वास्तव्य करीत आहेत. या मेटल बॉक्स कंपनीच्या आवारात राहण्यास परवानगी नसताना देखील मोठी शेड उभारली गेली आहे. या शेडमध्ये सुमारे दीड हजार कामगार अगदी दाटीवाटीने राहत असून त्या शेडमध्येच स्नानगृह व शौचालय देखील उभारण्यात आले आहे. शेडमधील सांडपाणी देखील शेजारीच असलेल्या नाल्यामध्ये सोडले जात आहे. येथील कामगार कोरोनाचे सर्व नियम धाब्यावर बसवून वास्तव्य करीत असल्यामुळे परिसरात कोरोनाच्या संसर्गाचा धोका निर्माण झाला आहे.
चेंबूरच्या माहुल गाव, प्रयागनगर, प्रकाशनगर, विष्णूनगर, गव्हाणपाडा व वाशी नाका परिसरात मोठ्या प्रमाणात लोकवस्ती आहे. तसेच आजूबाजूला पेट्रोलियम, केमिकल व ऑइल कंपन्या असल्याने येथे दररोज मोठ्या प्रमाणात कामगारांची ये जा सुरू असते. यातील काही कामगार प्रकाश नगर येथील एका कंपनीतील अनधिकृत शेडमध्ये राहत आहेत. सायंकाळच्या वेळेस कामावरून घरी परतल्यावर या कामगारांची येथे मोठी गर्दी होते. त्याचप्रमाणे हे कामगार येथील परिसरात विनामास्क फिरत असतात. यामुळे या परिसरामध्ये कोरोनाचा धोका निर्माण झाला आहे.
या कामगारांची राहण्याची व्यवस्था दुसऱ्या ठिकाणी करून ही शेड तोडण्याची मागणी स्थानिक नागरिकांच्या वतीने करण्यात येत आहे. याप्रकरणी मेटल बॉक्स कंपनीच्या व्यवस्थापकांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया मिळाली नाही.
अजित नरवडे (सहाय्यक आयुक्त, एम पूर्व विभाग) - मेटल बॉक्स कंपनीत अनधिकृतपणे शेड उभारून कामगार वास्तव्य करत असल्याच्या अनेक तक्रारी माझ्याकडे आल्या. याआधी या अनधिकृत शेडवर कारवाई करण्यात आली होती. मात्र हे शेड पुन्हा उभारले गेल्यामुळे पालिकेच्या वतीने पोलिसांत तक्रार करण्यात आली. याप्रकरणी आरसीएफ पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानुसार आता पुढील कारवाई केली जाईल.