Join us  

खोदलेल्या रस्त्याला कंपनी जबाबदार

By admin | Published: January 05, 2016 2:46 AM

नवीन जोडणी अथवा केबल्स टाकण्यासाठी खोदलेले रस्ते संबंधित कंपन्या काम झाल्यानंतर पूर्ववत करीत नाहीत़ यामुळे खड्ड्यात गेलेल्या रस्त्यांवर अपघात होऊन पालिकेला

मुंबई : नवीन जोडणी अथवा केबल्स टाकण्यासाठी खोदलेले रस्ते संबंधित कंपन्या काम झाल्यानंतर पूर्ववत करीत नाहीत़ यामुळे खड्ड्यात गेलेल्या रस्त्यांवर अपघात होऊन पालिकेला टीकेचे धनी व्हावे लागत असल्याने अशा कंपन्यांना चाप लावण्याचा ठराव पालिकेच्या महासभेपुढे आला आहे़ त्यानुसार खोदलेल्या रस्त्यावर एखादी दुर्घटना घडल्यास संबंधित कंपनीवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणीच करण्यात आली आहे़मुंबईत एकूण २८ उपयोगिता सेवा कंपन्या आहे़ यामध्ये बेस्ट, वीज, गॅस, टेलिफोन कंपन्यांचा समावेश आहे़ या कंपन्या दरवर्षी नवीन कनेक्शनसाठी रस्ते खोदतात़ मात्र हे रस्ते पूर्ववत करताना संबंधित कंपन्या खबरदारी घेत नाहीत़ अनेक वेळा रस्त्यावरील मॅनहोल्सचे झाकण उघडे राहते, अथवा रस्ते असमतोल होतात़ अशा रस्त्यांवर अपघात होतात, ज्याचे परिणाम पालिकेला भोगावे लागतात़ अशा शहरात अनेक घटना घडल्या असल्याने अशा कंपन्यांना चाप लावण्याची मागणी नगरसेवकांकडून होत आहे़ या कंपन्या नवीन कनेक्शन टाकून कोट्यवधी रुपये कमवत असतात़ त्यामुळे त्यांनी खणलेला रस्ता पूर्ववत करणे ही त्यांची जबाबदारी आहे़ एखाद्या कंपनीने आपल्या कामात हलगर्जीपणा केल्यास त्या रस्त्यावरील अपघाताप्रकरणी संबंधित कंपनीवर कायदेशीर कारवाई करण्याची ठरावाची सूचना पालिका महासभेपुढे आली आहे़ ही सूचना मंजूर झाल्यानंतर आयुक्तांच्या अभिप्रायासाठी पाठविण्यात येणार आहे़ (प्रतिनिधी)