मुंबई : आईस्ड डेझर्ट अँड फूड पार्लर या पुणेस्थित कंपनीत आर्थिक गैरव्यवहार करत कंपनीची ४२ कोटींची अफरातफर करणाऱ्या कंपनीच्या दोन माजी संचालकांची ९ कोटी ७७ लाख रुपयांची मालमत्ता ईडीने (सक्तवसुली संचालनालय) जप्त केली आहे. जप्त केलेल्या मालमत्तेमध्ये पुण्यातील सहा अचल मालमत्ता तसेच फिक्स्ड डिपॉझिट, शेअर्स व म्युच्युअल फंडात असलेल्या पैशांचा समावेश आहे.
रवी रामसुब्रह्मण्यम आणि राजीव माता हे दोघे आयडीएफपीएल कंपनीमध्ये संचालक होते. या दोघांनी २००३ ते २०१६ या कालावधीमध्ये कंपनीचे ४२ कोटी रुपये लंपास केले. कंपनीच्या आर्थिक ताळेबंदात मात्र बनावट नोंदी केल्याचा त्यांच्यावर ठपका आहे. यानंतर पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार करण्यात आली होती. त्यानंतर हा तपास ईडीकडे वर्ग करण्यात आला होता. या दोघांनी मोठ्या मालमत्तांची खरेदी केल्याचे तपासात दिसून आले.