Join us

दिल्लीच्या तुलनेत मुंबईत काेराेनावर बऱ्यापैकी नियंत्रण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2020 9:17 AM

प्रशासनाच्या प्रयत्नांना यश : सार्वजनिक कार्यक्रमांना बंदी घालण्यासह नियमांचे काटेकाेर पालनलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : जगभरात कोरोनाच्या लाटेने ...

प्रशासनाच्या प्रयत्नांना यश : सार्वजनिक कार्यक्रमांना बंदी घालण्यासह नियमांचे काटेकाेर पालन

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : जगभरात कोरोनाच्या लाटेने थैमान घातले असून, आता दिल्लीमध्येदेखील कोरोनाचा उद्रेक झाला आहे. मात्र त्या तुलनेत मुंबईत बऱ्यापैकी कोरोनावर नियंत्रण मिळविण्यात आले असून, याचे सारे श्रेय येथील महापालिका आणि सरकारला आहे. कारण उत्सव असो किंवा कार्यक्रम. या सर्वांवर बंदी घालण्यासह नियम अधिकाधिक कठोर केल्याने, चाचण्या वाढविल्याने आणि सुरक्षितता बाळगल्याने दिल्लीच्या तुलनेत मुंबई कोरोनावर चांगले नियंत्रण मिळवित असल्याचा दावा प्रशासनाकडून केला जात आहे.

गणेशोत्सव, नवरात्रौत्सव, दिवाळी आणि छठपूजासारख्या महोत्सवांबाबत सातत्याने काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले. कोरोना काळात लॉकडाऊन कायम ठेवण्यात महाराष्ट्र सरकार ठाम राहिले. शाळा, मंदिर स्थळे, मॉल, सिनेमा हॉल, रेस्टॉरंट्स आणि लोकल पुन्हा सुरू करण्यास परवानगी दिली नाही. त्याऐवजी लॉकडाऊनची मार्गदर्शक तत्त्वे जारी केली. गणेशोत्सवावेळी मुंबईने संयम दाखविला.

सामुदायिक दिवाळी साजरा करण्यासही बंदी घातली गेली. दिल्ली सरकारनेही वेळोवेळी अनेक मार्गदर्शक सूचना दिल्या. मात्र त्याच वेळी, त्यांनी लॉकडाऊन विश्रांती आणली. बाजारपेठा खुल्या केल्या. दारूच्या दुकानांवरचे निर्बंध हटविले. परिणामी, कोरोना नियमांचा फज्जा उडाला. मुंबईत मात्र नियम पाळले गेले. मुंबईत लोकांना घरामध्येच राहण्यास सांगण्यात आले. एका ठिकाणी पाचपेक्षा जास्त लोक एकत्र येऊ शकत नाहीत, अशी बंधने घालण्यात आली. मास्क अनिवार्य करण्यात आले. नियम मोडणाऱ्यांना दंड आकारण्यात आला.

* याचा सकारात्मक परिणाम

कोरोनावाढीचा दर तसेच मृत्युदर कमी होताना दिसत असले तरी गाफील न राहता युरोपप्रमाणे दुसऱ्या लाटेचा मुकाबला करण्याची तयारी राहू द्या. ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या मोहिमेमुळे आपण संसर्ग रोखण्यात काही प्रमाणात यशस्वी झालो असून, डिसेंबरमध्येही ही मोहीम परिणामकारकपणे राबविण्याचे नियोजन करा, अशा सूचना यापूर्वीच देण्यात आल्या आहेत. सावधानता बाळगा आणि मास्क लावणे, सुरक्षित अंतर राखणे, हात वारंवार धुणे या नियमांचे पालन नागरिक करतील हे काटेकोरपणे पाहा, अशा सूचना राज्याने महापालिकेला दिल्या आहेत. जनतेच्या खूप जास्त संपर्कात येणारे लोक, बस चालक-वाहक, सार्वजनिक व्यवस्थेतील कर्मचारी हे सुपर स्प्रेडर्स असू शकतील. त्यामुळे त्यांच्या चाचण्या लगेच करून घेण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. याचा सकारात्मक परिणाम म्हणून मुंबईत काेराेना बऱ्यापैकी नियंत्रणात असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

------------------