Join us

गतवर्षीच्या तुलनेत अकरावी प्रवेशात दुपटीने वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2016 3:41 AM

दहावीनंतर तंत्रनिकेतला (पॉलिटेक्निक) प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत घट होत असताना अकरावीला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत मात्र दुपटीने वाढ झाली आहे.

मुंबई : दहावीनंतर तंत्रनिकेतला (पॉलिटेक्निक) प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत घट होत असताना अकरावीला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत मात्र दुपटीने वाढ झाली आहे. दरवर्षी मुंबईत सुमारे एक लाख विद्यार्थी अकरावी प्रवेश घेतात. मात्र, यंदा अकरावी प्रवेशाचा आकडा २ लाखांवर गेला आहे. त्यामुळे राज्यातील पॉलिटेक्निक महाविद्यालये बंद होण्याच्या मार्गावर असून, कनिष्ठ महाविद्यालयांच्या मागणीत वाढ होताना दिसत आहे.यंदा अकरावीचे १०० टक्के प्रवेश आॅनलाइन पद्धतीने होत आहेत. त्यानुसार, आॅनलाइन प्रवेशासाठी पार पडलेल्या चार गुणवत्ता याद्यांसाठी एकूण २ लाख २२ हजार ६२२ विद्यार्थ्यांनी पहिल्या टप्प्यात अर्ज केले होते. त्यानंतर, अर्धवट अर्ज भरलेल्या विद्यार्थ्यांपैकी ९ हजार ६४९ विद्यार्थ्यांनी पाचव्या फेरीसाठी दुसऱ्या टप्प्यात अर्ज केले. अशा प्रकारे एकूण २ लाख ३२ हजार २७१ विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी अर्ज केले होते. त्यापैकी आत्तापर्यंत अकरावीच्या कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेसाठी एकूण २ लाख ०२ हजार ८६८ विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला आहे. यामध्ये आॅनलाइनच्या १ लाख ५९ हजार २७२ प्रवेशांसह अल्पसंख्याक, इन-हाउस आणि व्यवस्थापन कोट्यातील ४३ हजार ५९६ प्रवेशांचा समावेश आहे.अकरावी प्रवेशासाठी अर्ज केलेल्या २ लाख ३२ हजार २७१ विद्यार्थ्यांपैकी एकूण २ लाख ०२ हजार ८६८ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला आहे. परिणामी, दुसऱ्या विशेष फेरीत उरलेल्या २९ हजार ४०३ विद्यार्थ्यांकडून अर्ज येण्याची शक्यता आहे. त्यासाठी ७८ हजार ८७१ जागा रिक्त आहेत. त्यामुळे अकरावीच्या ४५ हजारांहून अधिक जागा यंदा रिक्त राहण्याची शक्यता आहे. मात्र, पॉलिटेक्निक प्रवेशाच्या तुलनेत हा आकडा फार कमी आहे. एकंदरीत पॉलिटेक्निक प्रवेशाकडे पाठ फिरविलेल्या विद्यार्थ्यांनी यंदा अकरावी प्रवेशाला पसंती दिल्याचे चित्र आहे. त्यामुळे विज्ञान शाखेतून बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर संबंधित विद्यार्थ्यांमुळे अभियांत्रिकी प्रवेशाच्या संख्येतही वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. (प्रतिनिधी)