लोकसंख्येच्या तुलनेत सुविधा तोकड्याच, मुंबईवरील ताण वाढतोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2018 07:10 AM2018-01-02T07:10:47+5:302018-01-02T07:10:57+5:30

मुंबईचा आकार, साधन संपत्ती, वाहतूक व्यवस्था मुंबईतील लोकसंख्येला तारून नेण्यात कमी पडत आहे. मुंबईवरील ताण दिवसेंदिवस वाढतोय, त्या तुलनेत उपलब्ध साधने, जागा अपुरी पडतेय आणि हेच मुंबईच्या समस्यांचे मूळ आहे, असा सूर तज्ज्ञांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला.

 Compared to the population, the stress of Mumbai is increasing | लोकसंख्येच्या तुलनेत सुविधा तोकड्याच, मुंबईवरील ताण वाढतोय

लोकसंख्येच्या तुलनेत सुविधा तोकड्याच, मुंबईवरील ताण वाढतोय

Next

- कुलदीप घायवट
मुंबई  - मुंबईचा आकार, साधन संपत्ती, वाहतूक व्यवस्था मुंबईतील लोकसंख्येला तारून नेण्यात कमी पडत आहे. मुंबईवरील ताण दिवसेंदिवस वाढतोय, त्या तुलनेत उपलब्ध साधने, जागा अपुरी पडतेय आणि हेच मुंबईच्या समस्यांचे मूळ आहे, असा सूर तज्ज्ञांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला. विशेषत: पश्चिम रेल्वे मार्गावरील एल्फिन्स्टन रेल्वे स्थानकात झालेली चेंगराचेंगरी, भेंडीबाजार येथे कोसळलेली इमारत, साकीनाका येथे लागलेली आग, लोअर परळ येथील आग, घाटकोपर येथे कोसळलेली इमारत; अशा अनेक दुर्घटना घडल्यानंतर येथे सेवा-सुविधा पुरविण्यात मुंबई महापालिका तोकडी पडते आहे. विशेषत: मुंबई महानगर प्रदेशाचा विचार करता प्रदेशातील सर्वच प्राधिकरणांनी लोकसंख्येला आवश्यक पायाभूत सेवा सुविधा देण्यासाठी तत्पर असले पाहिजे. प्रत्यक्षात मात्र चित्र उलटे आहे. परिणामी नव्या वर्षात तरी मुंबई महानगर प्रदेशातील प्राधिकरणे लोकसंख्येला आवश्यक सेवा-सुविधा देण्यासाठी कार्यतत्पर राहतील, अशी आशा सर्वसामान्यांनी व्यक्त केली आहे.

समस्येवर तोडगा काढणे गरजेचे आहे. जशी समस्या असेल तसा उपाय होणे गरजेचे आहे. सुरुवातीला जत्रा व यात्रेप्रसंगी दुर्घटना होत असत. पण एल्फिन्स्टन-परळसारख्या घटना रोजचा भाग बनल्या आहेत. व्यवस्थेच्या आणि एकंदर व्यवस्थानिर्मितीच्या बालिश हाताळणीमुळे असे प्रकार वाढत चालले आहेत. त्यामुळे मृत्युमुखी होणाºयांची संख्या वाढणारच. कमला मिलच्या दुर्घटनेनंतर मुंबईत ठिकठिकाणी करण्यात आलेल्या कारवाया हास्यास्पद आहेत. आपल्याकडे आपत्कालीन यंत्रणा नावाचा प्रकारच नाही. केवळ ‘सज्ज’ असे बोलून पुढे त्याचे तीनतेरा वाजलेले दिसतात. शहराची रचना आणि विस्तार होताना दिसत नाही. सरकार कोणाचेही असो जबाबदारी कोणाचीही असो, सर्वपक्षीय लोकप्रतीनिधींसोबत नागरिकांनी एकत्र येऊन तोडगा काढायला हवा. - निखिल राऊत, अभिनेता

ब्रिटिशांनी येथील रिक्त जागेमध्ये योजनाबद्ध काम करून दक्षिण मुंबई तयार केली. ब्रिटिशांनी केलेल्या उत्तम नियोजनाप्रमाणे नवीन नियोजनाची आवश्यकता आहे. मुंबईला महानगरपालिका, म्हाडा, रेल्वे, बेस्ट, एमटीएनएल, टाटा पॉवर, अदानी पॉवर, पोलीस, मोनो, मेट्रो, एमएमआरडीए, एमएसआरटीसी, एमआरव्हीसी यासारख्या शहरातील कामकाज हाताळणाºया आपल्याकडे अनेक संस्था आहेत. पण या सर्वांना एकत्रित घेऊन त्यांच्यातून उत्कृष्ट कामकाज करणारे प्रशासक नाहीत. या सर्वांवर प्रशासक म्हणून शहराचा महापौर असावा. महापौराला सर्वाधिक अधिकार देऊन ते वापरण्याची पूर्ण मुभा असावी. असे झाल्यावर महापौर मुंंबईचा आमूलाग्र बदल घडवेल.
- रोहित कात्रे, वाहतूकतज्ज्ञ

मुंबईमध्ये असुरक्षितता वाढत आहे; याचे मूळ कारण असे की लोकसंख्या वाढत आहे. ज्याच्या हातात सत्ता आहे त्यांनी त्यांच्या मर्यादा दाखवून दिल्या आहेत. व्यवस्थेला भ्रष्टाचाराची किड लागली आहे. त्यामुळे रेल्वे, रस्ते वाहतूक, इमारती, यांच्यामध्ये नफा कमवण्याच्या नादात सुरक्षितता ऐरणीवर ठेवण्यात आलेली आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर शहराचे नाव घेण्यात येते. मात्र येथील वस्तुस्थिती कशी आहे, हे सर्वांना माहीत आहे. तसेच मुंबईकरांनी जागृत राहणे आवश्यक आहे. प्रत्येक गोष्टीची शहानिशा करणे गरजेचे आहे. तसेच आपल्या हक्कासह कर्तव्यपालनदेखील गरजेचे आहे.
- गणेश (अण्णा) मधुकर मुळेपाटील,
अध्यक्ष समांतर प्रतिष्ठान, मुंबई

सोसायटीत होत असलेल्या अनधिकृत बांधकामाची तक्रार पालिका, पोलिसांना देण्यात यावी. नागरिकांनी दुर्घटनेनंतर कसा बचाव करावा याचे ज्ञान प्राप्त करणे गरजेचे आहे. लोकसंख्या वाढत गेल्यामुळे गर्दीचे प्रमाण वाढत चाललेले आहे. त्यामुळे गर्दीचे व्यवस्थापन केले जाऊन वेळेचे पूर्वनियोजन करण्यात यावे.
- संजय शिंगे,
सामाजिक कार्यकर्ते

लोकांचा प्रत्येक निर्णयात सहभाग असावा आणि लोकांनी त्यावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. प्रशासन, पोलीस, रहिवासी यांचा एकमेकांशी संवाद होणे गरजेचे आहे. प्रत्येक नागरिकाने आपत्कालीन प्रशिक्षण घेणे गरजेचे आहे. प्रशासनला जबाबदारीची जाणीव नसल्याने अशा घटना घडत आहेत. नागरिकांनी सतर्क राहणे गरजेचे आहे. रेल्वे प्रवासात, हॉटेलमध्ये व इतरत्र प्रत्येक गोष्टीची पडताळणी करणे गरजेचे आहे. मुंबईमध्ये ‘नाइट लाइफ’ची आवश्यकता नाही. प्रशासनाने नाइट लाइफपेक्षा ‘डे लाइफ’ सुधारणे गरजेचे आहे.
- वर्षा विद्या विलास,
सरचिटणीस,
नशाबंदी मंडळ, महाराष्ट्र राज्य

हॉटेल, पब, रेस्टॉरंट, मॉल या ठिकाणी जाताना नागरिकांनी सजग राहून बाहेरचा जाणारा रस्ता कुठे आहे, तेथे अग्निसुरक्षा यंत्रणा आहे का याची चौकशी करणे महत्त्वाचे आहे. प्रशासनाने घटना झाल्यावरच कारवाई करणे, निलंबन करणे असे न करता घटना घडण्याच्याच आधी उपाययोजना करणे गरजेचे आहे. सोसायटीने वेळोवेळी फायर आॅडिट करायला पाहिजे.
- रमेश प्रभू, अध्यक्ष,
महाराष्ट्र सोसायटी वेल्फेअर असोसिएशन

प्रशासनाची भूमिका ही आरशासारखी असणे गरजेचे असून प्रतिबंधात्मक उपाय राबिवणे सर्वांच्या हिताचे आहे. शासनानेदेखील सबळ पुरावे राखून मोडकळीस आलेल्या इमारतींवर कारवाई केली पाहिजे. त्यासाठी खबरदारीची उपाययोजना करावी.
- डॉ. सुरेंद्र मोरे, चेअरमन,
मुंबई उपनगर
जिल्हा को-आॅप. हाउसिंग फेडरेशन

२०११ च्या जनगणनेनुसार, देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळख असलेल्या मुंबईची लोकसंख्या १ कोटी ८४ लाख आहे.
दिल्लीची लोकसंख्या १ कोटी ६३ लाख आहे. कोलकात्याची संख्या १ कोटी ४१ लाख आहे.

दिल्ली राष्ट्रीय राजधानी क्षेत्र (एनसीआर) ची लोकसंख्या २ कोटी १७ लाख आहे. एनसीआरमध्ये दिल्लीव्यतिरिक्त गुडगाव, फरिदाबाद, नोएडा आणि गाजियाबादचा समावेश आहे.
मुंबई महानगर प्रदेशाची लोकसंख्या २ कोटी ७ लाख आहे.

Web Title:  Compared to the population, the stress of Mumbai is increasing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई