मुंबई - भाजप नेते चंद्रकांत पाटील आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात नेहमीच शाब्दीक जुगलबंदी पाहायला मिळते. आता, अजित पवारांना सांभाळून बोलण्याचा थेट इशाराच चंद्रकांत पटील यांनी दिला आहे. ते कोल्हापुरात माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होते. चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडी सरकार महाराष्ट्र झोपेत असतानाच पडेल, असे भाकीत केले होते. त्यावरुन, शाब्दीक वाद रंगला आहे. या वादात आता अजित पवारांचे शिलेदार आमदार अमोल मिटकरी यांनी उडी घेतली आहे
महाराष्ट्र झोपेत असतानाच सरकार पडेल असं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केलं होतं. त्याला प्रत्युत्तर देताना अजित पवार यांनी चंद्रकांत पाटील यांनी हे वक्तव्य झोपेत असताना केलं की जागं असताना असा मिश्कील टोला हाणला होता. त्यावर चंद्रकांत पाटील यांनी चांगलाच संताप व्यक्त केल्याचे पाहायला मिळाले. (ajit pawar should speak carefully bjp leader Chandrakant Patil gives warning). त्यानंतर, आमदार अमोल मिटकरी यांनी चंद्रकांत पाटील यांची तुलना औरंगजेबाशी केली आहे.
चंद्रकांत पाटील यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे. पाण्याविना मासे तडफडतात तशी राज्यातील भाजप नेत्यांची अवस्था आहे. मात्र, त्यांनी उगाच सत्तेची स्वप्न पाहू नयेत. राज्यात पुढील 15 वर्षे महाविकास आघाडीची सत्ता असेल, असा दावा अमोल मिटकरी यांनी केला. तसेच, औरंगजेबाला ज्याप्रमाणे स्वप्नात शिवाजी महाराज दिसायचे. त्याप्रमाणेच चंद्रकांत पाटील यांना स्वप्नात केवळ अजित पवारच (Ajit Pawar) दिसतात, असेही त्यांनी म्हटले.
चंद्रकांत पाटील यानी मी फाटक्या तोंडाचा असा शब्दप्रयोग केला होता. त्यावरुनही मिटकरी यांनी ट्विट करुन चंद्रकांत पाटील यांना टोला लगावला आहे. इकडे फाटलेलें तोंड शिवणारे टेलर भरपूर आहेत, आणखी जास्त फाटू देऊ नये याची काळजी घ्या, असा टोला मिटकरी यांनी लगावला.
मी फाटक्या तोंडाचा - चंद्रकांत पाटील
"झोपेत कसं सरकार आणायचं हे अजित दादांनाच चांगलं माहित आहे. खुद्द शरद पवार झोपेत असताना त्यांनी सरकार आणलं होतं हे ते विसरलेत का? ज्यांच्या मांडीला मांडी लावून तुम्ही तीन दिवसांचं का होईना पण सरकार स्थापन केलंत त्यांच्यावर टीका करताना जरा तरी विचार करा", असं चंद्रकांत पाटील म्हणाले. यासोबतच "अजित दादा जरा सांभाळून बोला, मी फाटक्या तोंडाचा आहे. जर बोलायला लागलो तर तुम्हाला खूप महागात पडेल", असा थेट इशारा देखील चंद्रकांत पाटील यांनी यावेळी दिला. त्यामुळे अजित पवार आणि चंदक्रांत पाटील यांच्यातील वाकयुद्ध दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे.
मराठा आरक्षणासाठी आम्ही संभाजी राजेंसोबत
"मराठा आरक्षणासाठी जो जो कुणी संघर्ष करतोय किंवा करेल त्यांच्यासोबत आम्ही आहोत. संभाजी राजे तर आमचे राजे आहेत. आता मवाळ भूमिका घेऊन चालणार नाही. उलट त्यांनी या सरकारवर दबाव आणून यांच्याकडून आरक्षण मिळवून घेतलं पाहिजे. कोरोना आहे म्हणून संघर्ष थांबवून काही होणार नाही. या सरकारच्या मागे लागून आरक्षण मिळवावं लागेल आणि त्यासाठी आम्ही मराठा समाजासोबत आहोत", असं चंद्रकांत पाटील म्हणाले.