मुंबई - राज्य सरकारने कोरोनाचे निर्बंध लावल्याने मनसैनिक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. मनसेचे नेते राज्य सरकारवर एकापाठोमाग एक अशा पद्धतीने हल्लाबोल करत आहेत. दहीहंडी किंवा मंदिरे उघडण्यासाठी आंदोलन करुन जनतेचा जीव धोक्यात घालणाऱ्यांनी कोरोना विरुद्ध आंदोलन उभे करावे, असा टोला काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपा आणि मनसेला नाव न घेता लगावला होता. त्यावरून मनसेचे आमदार राजू पाटील आणि सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे.
मनसेचे आमदार राजू पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडले. आम्ही कोरोना संपवण्यासाठी आंदोलन करत आहोत, पण वसुली सोडून दुसरीकडे लक्ष द्यायला वेळ आहे का तुम्हाला?. एकाला ईडीची नोटीस आली की लावा लॅाकडाऊन, हे आता चालणार नाही, असा इशाराच राजू पाटील यांनी दिला आहे. तर, संदीप देशपांडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची तुलना प्लेगच्या साथीवेळी स्पेशल प्लेग किमिटीसाठी नियुक्त असलेल्या इंग्रज अधिकाऱ्यासोबत केली आहे.
''प्लेगची साथ आहे या नावावर 1897 साली रँडने जनतेवर भयानक अत्याचार केले. त्यावेळी चाफेकर बंधुंनी त्याला धडा शिकवला होता. आत्ताच्या आधुनिक रँडला येण्याऱ्या निवडणुकीत जनता धडा शिकवेल हे निश्चित,'' असे ट्विट करत देशपांडे यांनी नाव न घेता मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. गेल्या काही दिवसांपासून संदीप देशपांडे सातत्याने शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका करत आहेत.
मनसेच्या आमदारानेही साधला निशाणा
राजू पाटील यांनी ट्विट केले आहे. ते म्हणाले, "काल सेनेचे मुख्यमंत्री बोलले की ‘आंदोलन करायचेच झाले तर ते कोरोना संपविण्यासाठी करा.’ अहो आम्ही ते ही करत आहोत, पण वसूली सोडून दुसरीकडे लक्ष द्यायला वेळ आहे का तुम्हाला? एकाला ED ची नोटीस आली की लावा लॅाकडाऊन, हे आता चालणार नाही."