Join us

अमित शहांची तुलना पोर्तुगिज अन् इंग्रजांशी; शिवसेनेनं शिंदे-पवारांना फटकारलं

By ऑनलाइन लोकमत | Published: August 08, 2023 9:16 AM

पुण्यातील एका कार्यक्रमात उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी गृहमंत्री शहा यांच्यावर स्तुतिसुमनांचा वर्षाव केला.

मुंबई - भाजपाचे वरिष्ठ नेते आणि देशाचे गृह तथा सहकारीमंत्री अमित शहा पुणे दौऱ्यावर आले होते. सहकार विभागाच्या एका पोर्टलचे उद्घाटन करण्यासाठी ते महाराष्ट्र दौऱ्यावर आले असता राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी त्यांचं स्वागत केलं. पुण्यातील कार्यक्रमात हे सर्वजण एकत्र आले असताना मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी अमित शहांचे मोठे कौतुक केले. तसेच, त्यांच्या महाराष्ट्र आणि मुंबईशी असलेल्या नात्याबद्दलही सांगितलं. तर, अमित शहांनीही अजित पवारांवर स्तुतीसुमने उधळल्याचं पहायला मिळालं. त्यावरुन, आता शिवसेनेनं मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस आणि अजित पवारांना चांगलंच फटाकारलंय. 

अमित शहांना महाराष्ट्र कळतो म्हणजे नक्की काय? या मथळ्याखाली शिवसेनेच्या मुखपत्रातून अमित शहांवर बोचरी टीका करण्यात आलीय. पोर्तुगिज आणि इंस्ट इंडिया कंपनीच्या माध्यमातून इंग्रजही मुंबईत आले होते, असे म्हणत अमित शहांची तुलना इंग्रजांशी व पोर्तुगिजांशी करण्यात आलीय. पोर्तुगीज, ईस्टइंडियाचे व्यापारी आले-गेले, तसे सध्याचे धनिक व शेठ मंडळांचे सावटही दूर होईल. फडणवीस म्हणतात की , अमित शहा यांना महाराष्ट्र चांगला कळतो. बहुधा म्हणूनच ते मुंबई व महाराष्ट्रात निवडणुका घ्यायला धजावत नाहीत. व्यापारी बहुमत विकत घेतात, पण जनतेस सामोरे जात नाहीत. हे जुलमाचे व्यापारी राज्य लवकरच उलथे पडेल, असे शिवसेनेनं म्हटले आहे. 

आता हे नवे शेठ मंडळ आले

पुण्यातील एका कार्यक्रमात उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी गृहमंत्री शहा यांच्यावर स्तुतिसुमनांचा वर्षाव केला. फडणवीस यांनी इतके केले. मग मुख्यमंत्री मिंधे आणि अजित पवार तरी कसे मागे राहतील? त्यांचीही गाडी सुसाट सुटली. श्री. शहा यांचा जन्म मुंबईतला, शहा यांनी मुंबईत व्यापार केला आहे, कारखाना चालवला आहे, त्यांना महाराष्ट्र चांगला कळतो, असे प्रशस्तीपत्र फडणवीसांनी द्यावे यात आश्चर्य वाटावे असे काहीच नाही. जे व्यापारी डोक्याचे आहेत त्यांना मुंबईचे महत्त्व माहीत असायलाच हवे. पोर्तुगीजांनी मुंबईत व्यापार केला. त्यानंतर ईस्ट इंडिया कंपनीने मुंबईस व्यापारी केंद्र बनवले. आता हे नवे शेठ मंडळ आले.

मुंबईत जन्म घेतल्याचे पांग फेडता काय?

मोदी-शहा यांच्या काळात महाराष्ट्रातील मोठमोठे उद्योग, कार्यालये त्यांनी हलवून गुजरातला नेली. मुंबईत जन्म घेतल्याचे असे पांग ते फेडत आहेत काय? क्रिकेट ही मुंबईची ओळख. ते क्रिकेटही त्यांनी पद्धतशीरपणे गुजरातेत पळवले. शहा यांना महाराष्ट्राचा पाया खतम करायचा आहे. मऱ्हाटी राज्याला गुलाम करायचे आहे. म्हणून महाराष्ट्राचा स्वाभिमान असलेली शिवसेना तोडली व नंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे तुकडे करून महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा गळा घोटण्याचा प्रयत्न चालवला आहे. हे सर्व घडवून आणण्यासाठी त्यांनी महाराष्ट्रातील सर्व ओवाळून टाकलेल्या भ्रष्ट लोकांची 'मोट' बांधली व राज्याची सूत्रे त्यांच्या हाती दिली. सत्तेवर सर्व मिंधे, पण बादशाही गुजरातकडे असे जे चित्र दिसत आहे ते महाराष्ट्राच्या स्वाभिमानास ठेच पोहोचविणारे आहे.

आम्हाला अजित पवारांच्या प्रकृतीची चिंता

मिंधे मुख्यमंत्री म्हणाले, शहा हे महाराष्ट्राचे जावई आहेत. मग हुंडा म्हणून ते महाराष्ट्रातील उद्योग, गुंतवणूक, मुंबईतील धनसंपत्ती गुजरातेत घेऊन चालले आहेत काय? याचे उत्तर द्या. अजित पवार हे तर इतक्या ओशाळवाण्या पद्धतीने बोलत आहेत की, त्यांना पाठकणा आहे की नाही? असा प्रश्न पडू लागला आहे. ''महाराष्ट्राचे एकमेव हितकर्ते अमित शहाच,'' अशी भाषणे अजित पवार करू लागले आहेत. आम्हाला त्यांच्या प्रकृतीची चिंता वाटत आहे. अमित शहा यांनी महाराष्ट्राच्या कोणत्या प्रश्नांवर ठोस भूमिका घेतली? मुंबईत जन्मले, महाराष्ट्राचे जावई झाले, येथे कारखाना चालवला, यात महाराष्ट्राला काय मिळाले? निदान सीमा भागातील मराठी बांधवांवर होणाऱ्या अत्याचारांवरतरी गृहमंत्री शहांना भूमिका घ्यायला लावा. तर त्या जावयांची ओवाळणी करू, अशा शब्दात शिवसेनेच्या अग्रलेखातून मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवारांवर निशाणा साधण्यात आलाय.  

टॅग्स :अमित शाहशिवसेनासंजय राऊतअजित पवारएकनाथ शिंदेदेवेंद्र फडणवीस