Join us

उद्धव की राज?, कुणाची सभा दणदणीत?; सोशल मीडियावर चर्चा रंगली खणखणीत

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2022 11:09 AM

उद्धव ठाकरेंच्या सभेला आलेली गर्दी आणि राज ठाकरेंच्या सभेची गर्दी यावर सोशल मीडियात तुलना होऊ लागली आहे.

मुंबई – गेल्या महिनाभरापासून राज्यात सभांचा धडाका सुरू आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे(Raj Thackeray) यांनी गुढी पाडवा मेळाव्यात घेतलेल्या प्रखर हिंदुत्वाच्या भूमिकेनंतर सातत्याने सत्ताधारी शिवसेनेवर टीका होऊ लागली. मनसे-भाजपा यांनी घेतलेल्या सभांना उत्तर म्हणून शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील बीकेसी मैदानात सभा घेतली. या सभेसाठी शिवसेनेने मोठ्या प्रमाणात जाहिरात केली होती. त्यामुळे सगळ्यांचे लक्ष या सभेवर लागलं होतं.

अखेर उद्धव ठाकरेंनी(Uddhav Thackeray) सभा पार पडली. अपेक्षेप्रमाणे त्यांनी मनसे-भाजपावर निशाणा साधला. मात्र आता या सभेच्या गर्दीविषयी सोशल मीडियात विविध चर्चांना उधाण आलं आहे. शिवसेना समर्थकांकडून उद्धव ठाकरेंच्या सभेला लोकांचा महापूर असल्याचं सांगण्यात येत आहे. त्याप्रकारे व्हिडीओ व्हायरल केले जात आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी ही सभा शंभर सभांचा बाप असेल असा दावा केला होता. त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या सभेला आलेली गर्दी आणि राज ठाकरेंच्या सभेची गर्दी यावर सोशल मीडियात तुलना होऊ लागली आहे.

“भाजपचे हिंदुत्व विकृत, विखारी अन् गळेकापू”; भव्य सभेत उद्धव ठाकरेंचा कडाडून हल्लाबोल

राज ठाकरेंच्या औरंगाबादमधील सभेला पोलिसांनी १५ हजार लोकांची परवानगी दिली होती. प्रत्यक्षात याठिकाणी ३० ते ३५ हजार लोक जमले होते असा दावा पोलिसांनी केला. तर उद्धव ठाकरेंच्या सभेला २०-२५ हजार लोक जमले होते अशी चर्चा सुरू आहे. विशेष म्हणजे बाळासाहेब ठाकरेंची सभा म्हटलं तर गर्दीने खचाखच भरलेले मैदान, उत्साह, घोषणाबाजी असं चित्र पाहायला मिळत होते. परंतु उद्धव ठाकरेंच्या बीकेसीतील सभेत नियमांच्या चौकटीत खुर्च्यांवर बसलेले शिवसैनिक पाहायला मिळाले. संपूर्ण मैदानात खुर्च्या लावलेल्या पाहायला मिळाल्या. सभेला १ तास शिल्लक असताना मोठी गर्दी झाल्याचं पाहायला मिळालं. सभास्थळी शिवसैनिक शांतपणे सभा ऐकत असल्याचं चित्र होते. उद्धव ठाकरेंच्या सभेत राज यांच्यावर टीका झाल्यानंतर काही प्रमाणात टाळ्या वाजवून दाद देण्यात आली. परंतु उर्वरित सभेत कुठेही जोश, उत्साह दिसला नाही.

शिवसंपर्क अभियान: हिंदुत्व, विकासकामे, महागाई; शिवसेनेच्या सभेची त्रिसूत्री, अयोध्या दौरा १५ जूनला

या उलट राज ठाकरेंच्या सभेला घालून दिलेल्या अटींपेक्षा दुप्पट गर्दी झाल्याचं पाहायला मिळालं. राज आणि उद्धव ठाकरे यांच्या दोन्ही सभेची ड्रोनद्वारे घेतलेले चित्रण पाहिलं तर राज ठाकरेंच्या सभेला लोकांनी खचाखच भरलेले मैदान दिसून आले तर उद्धव ठाकरेंच्या सभेला सांस्कृतिक कार्यक्रमाला असणाऱ्या गर्दीसारखं चित्र दिसून आले. राज ठाकरेंच्या औरंगाबादच्या सभेची बाळासाहेब ठाकरे यांच्या सभेशी तुलना झाली. तेव्हा प्रत्यक्षात बाळासाहेबांच्या सभेहून किंचित कमी गर्दी असल्याचं स्थानिकांनी सांगितले. परंतु मैदानात जोश, उत्साह आणि तरुणाई तितक्याच मोठ्या प्रमाणात होती असंही प्रत्यक्षदर्शी म्हणाले होते.  

टॅग्स :राज ठाकरेउद्धव ठाकरे