पीएसआयपदासाठी अनुकंपा लागू नाही, मॅट कोर्टाचा निर्वाळा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2021 06:48 AM2021-11-19T06:48:39+5:302021-11-19T06:51:22+5:30
मॅटचा निर्वाळा, वडिलांचे कर्करोगाने निधन झाल्याने वारसाला नोकरी देण्यास नकार
अमर मोहिते
मुंबई : पोलीस उप निरीक्षक पदी कार्यरत असताना वडिलांचे कर्करोगाने निधन झाले. त्यामुळे पोलीस खात्यात अनुकंपा तत्त्वावर नोकरी देण्याची एका मुलाची मागणी महाराष्ट्र प्रशासकीय लवादाने (मॅट) फेटाळली. प्रवीण रमेश मोरे यांनी यासाठी मॅटमध्ये अर्ज केला होता. मोरे उल्हासनगर येथे राहतात. त्यांचे वडील रमेश रंगा मोरे हे पोलीस उप निरीक्षक म्हणून कार्यरत होते. २४ नोव्हेंबर २०१२ रोजी शहापूर येथे कार्यरत असताना नाशिक-मुंबई महामार्गावर अपघात झाला होता. स्टेशनरी वाहून नेणारा एक ट्रेलर पलटी झाला होता. महामार्गावर वाहतूककोंडी झाली होती. पोलीस उप निरीक्षक मोरे हे तातडीने घटनास्थळी गेले. त्यावेळी तेथे भरधाव वेगाने जात असलेल्या टेम्पोने त्यांना धडक दिली. त्यांच्या डाव्या हाताला व दोन्ही गुडघ्यांना दुखापत झाली. त्यांच्यावर उपचार झाले. मात्र, २३ नोव्हेंबर २०१३ रोजी रमेश यांचे कर्करोगाने निधन झाले.
वडिलांच्या निधनानंतर प्रवीण यांनी विशेष बाब म्हणून अनुकंपा तत्त्वावर पोलीस खात्यात नोकरी द्यावी, अशी मागणी केली. मुख्यमंत्री व स्थानिक आमदारांकडेही यासाठी अर्ज केला. उभयंतांनी पोलीस खात्याकडे त्यांचा मागणी अर्ज पाठवून दिला. पोलीस प्रशासनाने त्यांची मागणी अमान्य केली. अखेर त्यांनी मॅटमध्ये धाव घेतली. मॅट सदस्य ए. पी. कुऱ्हेकर यांच्यासमोर यावर सुनावणी झाली. पोलीस उप निरीक्षक पद हे ‘ब’ श्रेणीत मोडते. ब श्रेणीसाठी अनुकंपा लागू होत नाही. ‘ क’ व ‘ड’ श्रेणीसाठी अनुकंपा लागू आहे. मात्र, नक्षली किंवा अतिरेकी हल्ल्यात मृत्यू झाल्यास पोलीस उप निरीक्षकाच्या वारसाला अनुकंपा तत्त्वावर नोकरी दिली झाली.
रमेश मोरे यांना कर्तव्यावर असताना अपघात झाला. उपचार घेत असताना त्यांना कर्करोग झाला. त्या व्याधीने त्यांचे निधन झाले. विशेष बाब म्हणून रमेश मोरे यांच्या वारसाला पोलीस खात्यात नोकरी द्यावी, अशी मागणी ॲड. अरविंद बांधिवडेकर यांनी प्रवीण मोरे यांच्या वतीने केली. रमेश मोरे यांचे कर्करोगाने निधन झाले आहे. त्यांच्या वारसाला अनुकंपा लागू होत नाही, असा दावा सरकारी वकील ॲड. क्रांती गायकवाड यांनी केला.
‘अतिरेकी, नक्षली हल्ल्यात निधन झाल्यास पात्र’
nराज्य शासनाने २०१७ मध्ये काढलेल्या अध्यादेशानुसार अतिरेकी व नक्षली हल्ल्यात निधन झालेल्या पोलीस उप निरीक्षकांच्या वारसालाच अनुकंपा तत्त्वावर नोकरी दिली जाते. रमेश मोरे यांचे निधन या कारणामुळे झालेले नाही. या प्रकरणात विशेष बाब म्हणून हा अध्यादेश लागू होत नाही, असे नमूद करीत प्रवीण मोरे यांची मागणी मॅटने फेटाळून लावली.