Join us

शेतकऱ्यांना प्रतीक्षा नुकसान भरपाईची

By admin | Published: June 13, 2014 11:28 PM

दरवर्षीप्रमाणे या वर्षी देखील पावसाळा नजीक येऊन ठेपला आहे. पावसाळ्यात पूर, दरडी कोसळणे, घरांची पडझड अशा विविध पकारांनी शेतकरी व नागरिकांचे नुकसान होत असते

रोहा : दरवर्षीप्रमाणे या वर्षी देखील पावसाळा नजीक येऊन ठेपला आहे. पावसाळ्यात पूर, दरडी कोसळणे, घरांची पडझड अशा विविध पकारांनी शेतकरी व नागरिकांचे नुकसान होत असते. तहसिल प्रशासन अशा घटनानंतर केवळ पंचनामे करण्याचे सोपस्कार पार पाडते. संबंधिताना नुकसानभारपाई मिळवण्यासाठी वारंवार कार्यालयाचे हेलपाटे मारावे लागतात. यामुळे रोहा तालुक्यातील नागरिक त्रस्त आहेत. परंतू तहसिल प्रशासन मात्र यासाठी उदासिन असल्याचे दिसून येत आहे.मागील वर्षी जुलै महिन्यात चणेरा - बिरवाडी मार्गे - पांगळोली - रोहा या जिल्हा मार्ग क्र. ६४ चा सुमारे १५ ते २० मीटरचा भाग अतिवृष्टीने वाहून गेला होता. हा रस्ता वाहून गेल्याने लगतच्या शेतकऱ्यांच्या शेतीमध्ये चिखल, दगड, धोंडे यांचा ढीग झाला होता. बिरवाडी येथील बाळू लखू मुंगळे व अशोक मुंगळे या शेतकऱ्यांच्या शेताचे नुकसान झाले होते. जिल्हा परिषद प्रतोद पंडीत पाटील या एकमेव लोकप्रतिनिधीनी ३ किमी चिखल व दगड धोंड्यांमधून पायी चालत जावून परिस्थितीची पाहणी केली. इतकेच नव्हे तर सदरचा रस्ता पूर्ववत करण्यासाठी बहुमोल सहकार्य देखील केले. रोहा तहसिल कार्यालयात मात्र या घटनेची नोंद ना पंचनामे उपलब्ध अशी परिस्थिती आहे. याबाबत अनेक वेळा पाठपुरावा करुन देखील मागील १५ दिवसात तहसिल कार्यालयाकडून कोणतेही उत्तर अद्याप मिळाले नाही. यावरुन तहसिल प्रशासन शेतकऱ्यांबाबत उदासिन असल्याचे दिसून येत असल्याचे जितेंद्र जोशी यांनी सांगितले आहे.करंजविरा येथील रमेश कमलाकर ठाकूर यांच्या घराचे २०१२ साली छप्पर कोसळून नुकसान झाले होते. मागील २ वर्षे नुकसानभरपाई मिळवण्यासाठी ठाकूर व त्यांचे सहकारी तहसिल कार्यालयात फेऱ्या मारत आहेत. दोन वर्षानंतर त्यांना त्यांचे प्रकरण सापडत नसल्याचे सांगण्यात आले. यावरुन तहसिल कार्यालयाचा ढिसाळ कारभार निदर्शनास येत आहे. येत्या पावसाळ्यापूर्वी तरी मागील नुकसानग्रस्तांची भरपाई देण्याची तत्परता रोहा तहसिलदार उर्मिला पाटील यांनी दाखवावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. (वार्ताहर)