Join us

मच्छिमार बांधवांना आर्थिक नुकसान भरपाई द्या; शिवसेनेची आग्रही मागणी 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2019 5:39 PM

समुद्रात आलेल्या ‘क्वार व महा’ चक्रीवादळांमुळे व अतिवृष्‍टीमुळे मच्छिमारांचा ९० दिवसांचा हंगाम वाया गेला आहे.

मनोहर कुंभेजकर

मुंबई : समुद्रात आलेल्या ‘क्वार व महा’ चक्रीवादळांमुळे व अतिवृष्‍टीमुळे मच्छिमारांचा ९० दिवसांचा हंगाम वाया गेला आहे. परिणामी मुंबई शहर व उपनगरात 34 कोळीवाड्यांमधील मच्छिमारांवर उपासमारीची पाळी आली आहे.

27,उत्तर पश्चिम लोकसभा मतदार संघातील वर्सोवा हे मोठे मासेमारी बंदर असून येथे 350 मच्छिमार नौका आहेत.येथील मासेमारी धंद्यावर अवलंबून  3000 मच्छिमार कुटुंब अवलंबून आहेत.त्यांचे गेल्या 90 दिवसात सुमारे 50 कोटींचे आणि प्रत्येक मच्छिमारांचे सुमारे 14 लाखांचे आर्थिक नुकसान झाले आहे.त्यामुळे जशी शेतकऱ्यांना जशी दुष्काळात आर्थिक मदत मिळते त्याप्रमाणे मुंबईसह वर्सोव्यातील मच्छिमार बांधवांना आर्थिक नुकसान भरपाई द्या अशी आग्रही मागणी शिवसेनेच्यावतीने आज उत्तर पश्चिम लोकसभा मतदार संघाचे खासदार गजानन कीर्तिकर यांनी उपनगर जिल्‍हाधिकारी मिलींद बोरीकर यांच्याकडे केली आहे.

आज दुपारी त्यांनी वांद्रे पूर्व येथील उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन त्यांची भेट घेऊन त्यांना या संदर्भात निवेदन दिले.याप्रसंगी शिवसेना विधानसभा संघटक  यशोधर(शैलेश)फणसे, उपविभागप्रमुख राजेश शेट्ये उपस्थित होते. 

मुंबई शहर व उपनगरात अंदाजे ३४ पारंपारीक कोळीवाडे आहेत, या कोळीवाड्यांमध्‍ये मच्छिमारीसह मच्‍छी सुकवण्‍याचा व्‍यवसाय मोठ्या प्रमाणात केला जातो.1जून ते 31 जुलै या काळात मासेमारी बंद होती. दि. १ ऑगस्ट पासून मासेमारीचा हंमाग सुरू झाला, परंतु अतिवृष्‍टीमुळे वाळत घातलेली सर्व मच्‍छी वाहून गेली आहे. परिणामी मच्छिमारांवर उपासमारीची वेळ आली आहे. महाराष्‍ट्र शासनाने शेतक-यांना ज्‍या धर्तीवर आर्थिक नुकसान भरपाई देण्‍याचा निर्णय घेतला आहे, त्‍याच धर्तीवर या मच्छिमार बांधवांना देखील नुकसान भरपाई मिळणे अत्‍यंत गरजेचे आहे. तसेच समुद्रात आलेल्या ‘क्वार व महा’ चक्रीवादळांमुळे व अतिवृष्‍टीमुळे मच्छिमारांचा 90 दिवसांचा हंगाम वाया गेला आहे.

सतत ३ महिने मासेमारीसाठी गेलेल्‍या नौका प्रशासनाने परत बोलावल्‍यामुळे प्रत्‍येक फेरीचे बर्फ, डिझेल व खलासी मेहनताना वाया गेल्‍यामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक भुर्दंड मच्छिमारांना सोसावा लागला आहे. या सर्व मच्छिमार बांधवांच्‍या नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्‍याची मागणी खासदार  गजानन कीर्तिकर यांनी यावेळी उपनगर जिल्‍हाधिकारी मिलींद बोरीकर यांचेकडे केली.तात्‍काळ पंचनामे करून शासनाकडे पुढील कार्यवाहीसाठी पाठपुरावा करण्‍यात येईल असे आश्‍वासन त्यांनी दिले.

यावेळी सातबंगला सागर कुटीर येथील सागरी किनारा संरक्षक बंधारा बांधताना बाधित असलेल्या ४७ जणांना निवासी घर देण्यासंबधीची मागणी देखील खासदार कीर्तिकर यांनी या भेटी दरम्यान उपनगर जिल्हाधिकाऱ्यांकडे केली अशी माहिती शेवटी राजेश शेट्ये यांनी दिली.

टॅग्स :मच्छीमारशिवसेना