तोटा भरून काढण्यासाठी व्यावसायिक बनला एनआयएचा तोतया अधिकारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 04:35 AM2021-02-05T04:35:47+5:302021-02-05T04:35:47+5:30
काळाचौकी पोलिसांनी केले जेरबंद : खोट्या गुन्ह्यांत अडकविण्याची धमकी लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : राष्ट्रीय तपास यंत्रणेचे (एनआयए) अधिकारी ...
काळाचौकी पोलिसांनी केले जेरबंद : खोट्या गुन्ह्यांत अडकविण्याची धमकी
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राष्ट्रीय तपास यंत्रणेचे (एनआयए) अधिकारी असल्याचे भासवून खोट्या गुन्ह्यांत अडकविण्याची धमकी देणाऱ्या तिघांना काळाचौकी पोलिसांनी जेरबंद केले आहे. व्यवसायात तोटा झाल्याने व्यवसाय बंद करावा लागला. यातूनच झटपट पैसा कमाविण्यासाठी त्यांनी फसवणुकीचा धंदा सुरू केल्याची माहिती तपासात समोर आली आहे.
राजेश पवार, विजय सिंग आणि इक्बाल खान अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. यातील एक जण व्यावसायिक आहे. गेल्या वर्षी नोव्हेबर महिन्यात मुंबईतल्या एका बड्या व्यावसायिकाचे अपहरण करत, त्याला एनआयएचा अधिकारी असल्याचे सांगितले. तसेच ओळखपत्रही दाखवून विश्वास संपादन केला. त्यांना कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केल्याची तक्रार दाखल झाली असून, त्याच्या चौकशीसाठी ताब्यात घेतल्याचे सांगितले. तसेच लवकरच गुन्हा दाखल करत अटकेची भीती घातली. तसेच यातून सुटका व्हावी यासाठी दोन कोटींची मागणी करण्यात आली. पण २५ लाखांवर तडजोड झाल्यानंतर त्याला सोडण्यात आले. त्यानंतर या व्यावसायिकाने संबंधित अधिकाऱ्याची माहिती घेण्यास सुरुवात केली. त्यात, अशा नावाचा कोणी अधिकारी नसल्याचे समोर आले. यात फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांना धक्का बसला. मात्र बदनामीच्या भीतीने ते तक्रार देण्यासाठी पुढे आले नाहीत.
काही दिवसांनी अशाच प्रकारे अन्य एका व्यावसायिकाच्या फसवणुकीप्रकरणी काळाचौकी पोलिसांनी त्रिकुटाला अटक केल्याची माहिती त्यांना मिळाल्यावर त्यांनी पोलिसांत धाव घेतली. आरोपींचे फोटो त्यांना दाखवताच तेच तिघे असल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार संबंधित आरोपीविरुद्ध आणखीन एक गुन्हा नोंद करत पुन्हा अटक करण्यात आली. तर अशा प्रकारे तुमचीही फसवणूक झाली असल्यास पुढे येण्याचे आवाहन काळाचौकी पोलिसांनी केले आहे.