टपाल कर्मचाऱ्यांना दहा लाख नुकसान भरपाई, कर्मचारी संघटनेकडून स्वागत
By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2020 05:42 PM2020-04-18T17:42:09+5:302020-04-18T17:42:41+5:30
कोविड-19 च्या संदर्भातील परिस्थिती लक्षात घेऊन, टपाल कर्मचारी ड्युटीवर असताना या आजाराला बळी पडल्यास 10 लाखाची भरपाई देण्याचे ठरवण्यात आले आहे.
मुंबई : कोविड-19 च्या संदर्भातील परिस्थिती लक्षात घेऊन, टपाल कर्मचारी ड्युटीवर असताना या आजाराला बळी पडल्यास 10 लाखाची भरपाई देण्याचे ठरवण्यात आले आहे. ग्रामीण डाक सेवकांसह सर्व टपाल कर्मचाऱ्यांना हे लागू असेल. या संबधीचे निर्देश लगेचच अंमलात येतील आणि ते कोविड 19 चे हे संकट समाप्त होईपर्यंत लागू असतील, असे जाहीर करण्यात आले आहे.
टपालखात्याचे काम अत्यावश्यक सेवेत अंतर्भूत करण्यात आले आहे. ग्रामीण डाक सेवकांसह सर्वच टपाल कर्मचारी ग्राहकांना टपालाशिवाय विविध सेवा पोहचवण्यात मोलाची भूमिका बजाव आहेत. यात पोस्टल बचत खाते (पोस्ट ऑफिस सेव्हींग बँक), पोस्टल जीवन विमा, कोणालाही कोणत्याही बँकेतून पैसे काढण्याची आधारकार्ड आधारित पैसे काढण्याची सुविधा या सारख्या अनेक सेवांचा समावेश आहे. याशिवाय टपाल खाते स्थानिक प्रशासन आणि पोलिस अधिकाऱ्यांच्या परवानगीने कोविड 19 संच, खाद्यपदार्थाची पाकिटे, आणि औषधे देशाच्या विविध भागात पोचवतात. अशा प्रकारे टपाल कर्मचारी आपल्या दैनंदिन कार्यात पूर्णपणे सहभागी होत आहे.
टपाल खात्याच्या कर्मचाऱ्यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. ऑल इंडिया पोस्टल एम्प्लॉइज युनियनचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळकृष्ण चाळके म्हणाले, टपाल खात्याच्या कर्मचाऱ्यांची दखल सरकारने घेतल्याने मनापासून आनंद झाला आहे. वैद्यकीय सेवा पुरवणाऱ्यांना पन्नास लाखांचा विमा दिला जात असताना टपाल खात्याच्या कर्मचाऱ्यांना दहा लाखांची मदत तुलनेने तशी कमी आहे. मात्र सरकारने टपाल खात्याच्या कर्मचाऱ्यांची दखल घेत ही कार्यवाही केल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले.
मुंबईत व राज्याच्या कानाकोपऱ्यात टपाल खात्याचे कर्मचारी जीवाची बाजी लावून काम करत आहेत. मात्र मुंबईत पनवेल, विरार अशा दोन तीन ठिकाणांहून कर्मचाऱ्यांसाठी बेस्टची बससेवा सुरु करण्यात आली असली तरी ती अपुरी आहे. अनेक कर्मचाऱ्यांना वाहतूक व्यवस्था अनुपलब्ध असल्याने कार्यालयात येणे शक्य होत नाही. काही ठिकाणी कर्मचाऱ्यांची निवासस्थाने मुख्य रस्त्यापासून जास्त अंतरावर आहेत अशा प्रकरणात कर्मचाऱ्यांना कामावर येण्याची सक्ती केली जावू नये अशी मागणी चाळके यांनी केली. ज्या कर्मचाऱ्यांना सहजपणे कामावर येणे शक्य आहे ते सर्व कर्मचारी कामावर येत आहेत मात्र ज्यांना काही अडचण असेल त्यांची समस्या देखील प्रशासनाने समजून घेऊन कार्यवाही करावी असे आवाहन त्यांनी केले आहे.