Join us

सलूनच्या चुकीमुळे ग्राहकाला १ लाख ३० हजार रुपयांची मिळणार भरपाई

By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2018 3:19 AM

दोन वर्षांपूर्वी पवईतील येरा शहा यांनी घरी हेअर स्पा सर्व्हिससाठी ब्युटिशियनची नियुक्ती केली होती. मात्र, हेअर स्पा ब्युटिशियन अनुभवी नसल्याने शहा यांच्या डोक्याचे केस जळले.

मुंबई : दोन वर्षांपूर्वी पवईतील येरा शहा यांनी घरी हेअर स्पा सर्व्हिससाठी ब्युटिशियनची नियुक्ती केली होती. मात्र, हेअर स्पा ब्युटिशियन अनुभवी नसल्याने शहा यांच्या डोक्याचे केस जळले. त्यासंदर्भात शहा यांनी जिल्हा ग्राहक मंचाकडे धाव घेतली. अखेर त्या महिलेला खासगी सलूनकडून १ लाख ३० हजार रुपयांची भरपाई देण्याचा आदेश जिल्हा ग्राहक मंचाने दिला आहे.पवईतल्या खासगी सलूनकडून हेअर स्पा करण्यासाठी शहा यांनी २७ डिसेंबर २०१६ रोजी एका ब्युटिशियनला घरी बोलावले होते. त्या ब्युटिशियनच्या चुकीतून शहा यांच्या डोक्यावरचे केस जळले असून त्यांना शारीरिक व मानसिक त्रास झाला. या वेळी खासगी सलूनने आवश्यक काळजी घेतली नाही. प्रशिक्षित कर्मचारी पाठविला नाही. म्हणजे यात पूर्णपणे सलूनची निष्काळजी दिसते, असे मत ग्राहक मंचाने नोंदवले व खासगी सलूनने पीडित ग्राहकाला एक लाख रुपये मानसिक व शारीरिक दु:खासाठी द्यावे; तसेच तीस हजार रुपये वैद्यकीय खर्चासाठी देण्याचे आदेश जिल्हा ग्राहक मंचाने दिला.मुंबई ग्राहक पंचायतच्या अभियानप्रमुख वर्षा राऊत यांनी सांगितले की, बऱ्याच महिला पार्लरमध्ये गेल्यावर बिलाची मागणी करत नाहीत. लग्नाच्या वेळेस अनेक वर-वधू सलूनमध्ये जाऊन सौंदर्य खुलविण्यासाठी हजारो रुपये खर्च करतात. दरम्यान, योग्य सेवा किंवा काळजी घेतली गेली नाही तर मग अशा प्रकारचे गैरप्रकार आपल्यासोबतही घडू शकतात. सेवा घेतल्यावर आपल्याकडे बिल असणे आवश्यक आहे. समजा, उद्या एखादा गैरप्रकार घडला तर बिलाच्या आधारावर तुम्ही ग्राहक न्यायालयात दाद मागून नुकसानभरपाई मिळवू शकता.‘खासगी सलूनचा निष्काळजीपणा’येरा शहा यांच्या तक्रारीनुसार, ब्युटिशियन हेअर स्टीम व्यवस्थितरीत्या हाताळू शकत नव्हती. तसेच, उपकरणात जास्त गरम पाणी भरल्याने कानावर आणि खांद्यावर गरम पाण्याचा फवारा उडत होता. त्यामुळे शहा यांना शारीरिक वेदना झाल्या. नववर्षाच्या स्वागतासाठी शहा यांनी परदेशात जाण्याचा बेत आखला होता, परंतु झालेल्या त्रासामुळे त्यांना जाता आले नाही.

टॅग्स :मुंबई