तारापूर दुर्घटनेतील मृत कामगारांच्या कुटुंबीयांना 10 लाखांची भरपाई
By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2021 05:49 AM2021-09-06T05:49:27+5:302021-09-06T05:50:00+5:30
मृतदेह ताब्यात न घेण्याचा नातेवाईकांचा निर्धार : जखमींचा खर्च कंपनी करणार
लोकमत न्यूज नेटवर्क
बोईसर : स्फोटात मृत्यू पावलेल्या दोन्ही कामगारांच्या कुटुंबीयांना १० लाखांची भरपाई कंपनीकडून देण्यात येणार असून एका नातेवाईकाला योग्य ती नोकरी देऊन ईएसआयसी दाव्यासाठी कंपनी मदत करणार आहे. तसेच अंतिम संस्काराकरिता ५० हजारांची मदत करण्यात आली आहे. जखमींचा सर्व वैद्यकीय खर्च कंपनी करणार असून ते नियमित रोजगारात असतील. त्याचप्रमाणे सल्लागार डॉक्टरांनी काम सुरू करण्यासाठी वैद्यकीयदृष्ट्या तंदुरुस्त घोषित होईपर्यंत रुग्णालयात दाखल असेपर्यंत वेतन दिले जाईल, असे अपघातग्रस्त कंपनीच्या व्यवस्थापनाने रविवारी लेखी आश्वासन दिले आहे.
तारापूर एमआयडीसीमधील झकारिया इंडस्ट्रीज या टेक्स्टाईल कारखान्यामध्ये झालेल्या भीषण स्फोटात जागीच मृत पावलेल्या दोन्ही कामगारांच्या कुटुंबांना जोपर्यंत आर्थिक नुकसानभरपाई मिळणार नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याचा निर्धार नातेवाइकांनी केला होता. शनिवारी पहाटे झालेला भीषण स्फोट व नंतर लागलेल्या आगीमध्ये मिथिलेश राजवंशी (३८) आणि छोटेलाल सरोज (३७) या दोन कामगारांचा जळून जागीच मृत्यू झाला होता. मिथिलेशचा मृतदेह दुर्घटनेनंतर काही वेळातच हाती लागला असला, तरी आगीत शरीराचा कोळसा झाल्याने ओळख पटविणे शक्य नव्हते. परंतु, संध्याकाळी उशिरा छोटेलाल यादव (३७) याचा छिन्नविच्छिन्न, परंतु काहीसा ओळखता येईल असा मृतदेह ढिगाऱ्याखाली सापडल्यानंतर रात्री उशिरा बोईसर पोलिसांनी दोन्ही मृतदेह तारापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदनासाठी नेले. मात्र, मृतदेहांबरोबर त्यांचे नातेवाईक न आल्याने शवविच्छेदन करण्यास तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी असमर्थता दाखवली.
दरम्यान, शिवसेनेचे बोईसर विधानसभा क्षेत्रप्रमुख नीलम संखे यांनी जोपर्यंत मृत कामगारांच्या कुटुंबाला योग्य मोबदला मिळत नाही, तोपर्यंत त्यांचे मृतदेह ताब्यात घेतले जाणार नसून, कामगारांकरिता शिवसेनेचे चालू असलेले आंदोलन सुरू ठेवणार आहे. शिवसेना कामगारांसोबत राहणार असल्याचे सांगितले होते.